अभिनेता व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा मराठी सिनेसृष्टीत दबदबा आहे. अत्यंत खडतर परिस्थितीतून आलेले प्रवीण यांनी अभिनेता म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर ते कधीच मागे हटले नाही. अभिनयाबरोबरच ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘देऊळ बंद’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘धर्मवीर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी लेखन व दिग्दर्शनाची भूमिका उत्तमरीत्या पार पाडली आहे. प्रवीण यांची पत्नी स्नेहल तरडे हीदेखील प्रसिद्ध अभिनेत्री असून सिनेसृष्टीत कार्यरत आहे. आगामी लावण्यवती या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा स्नेहल पेलवताना दिसणार आहेत. (Pravin Tarde Wife Completed Study)
स्नेहल तरडे या सोशल मीडियावर सक्रिय असून त्या नेहमीच अनेक पोस्ट चाहत्यांसह शेअर करत असतात. अशातच स्नेहल यांनी सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या पोस्टमध्ये स्नेहल यांनी ‘Study of Vedas’ हा अभ्याक्रम पूर्ण केला आहे. अभ्यासक्रम पूर्ण करून अंतिम परीक्षेत ७८ टक्के गुण मिळवून त्यांनी यश संपादन केलं आहे.
स्नेहल यांनी पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “‘वेदांचा अभ्यास’. स्वतःला हिंदू म्हणताना, आपल्या धर्माला सर्वश्रेष्ठ मानताना तो धर्म ज्या चार वेदांवर आधारीत आहे त्या वेदांचा मी योग्य पद्धतीने अभ्यास केलेला नाही याची खंत मला अनेक दिवस सतावत होती. पुण्यातील ‘भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टम’ या संस्थेतर्फे Study of Vedas या अभ्यासक्रमात ७८ टक्के मिळवून आज ती खंत मी दूर केली. भारतातील अनेक मान्यवर गुरुजनांच्या मार्गदर्शनामुळे या विषयात आता आणखी खोलवर जाण्याची प्रेरणा मला मिळाली आहे, आशीर्वाद असावा!”.
स्नेहल तरडेंनी शेअर केलेली पोस्ट पाहून त्यांच्या चाहत्यांसह नेटकऱ्यांनी अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. याशिवाय अभिनेत्री प्राजक्ता माळीने सुद्धा खास पोस्ट शेअर करत स्नेहल यांचं कौतुक केलं आहे. प्राजक्ताने ही पोस्ट रिशेअर करत असं म्हटलं आहे की, “मनापासून अभिनंदन आमच्या दिग्दर्शिका. मला तुमचा अभिमान आहे”, असं म्हणत तिने स्नेहल यांचं कौतुक करणारी पोस्ट शेअर केली आहे.