Bhushan Pradhan Viral photo : मराठी सिनेविश्वात असे अनेक कलाकार आहेत जे नेहमीच धक्का देत अनेकांच्या नजरा वळवतात. काहीजण आई-बाबा झाल्याची गुडन्यूज देतात, तर काहीवेळा लग्न ठरल्याचं सांगतात, अनेकजण हल्ली अफेअरबाबत सोशल मीडियावर बातमी देतात, मात्र आता एका मराठमोळ्या अभिनेत्याने शेअर केलेल्या एका फोटोने साऱ्यांना संभ्रमात पाडलं आहे. ही गुडन्यूज जरा न पचवता येणारी आहे. लग्न न होता, थेट मॅटर्निटी फोटोसारखी पोज देत शेअर केलेले हे फोटो नक्की काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत हे कळत नाही आहे. हो. हे फोटो शेअर केले आहेत अभिनेता भूषण प्रधानने.
आजवर भूषणने अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत रसिकांच्या मनावर राज्य केलं. सोशल मीडियावर तर भूषण नेहमीच सक्रिय असतो. मराठी सिनेविश्वातील हँडसम बॉय म्हणूनही भूषणची ओळख आहे. भूषणने आजवर त्याच्या अभिनय कलेवर चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. नेहमीच तो त्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याबाबतचे अपडेट सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतो. अशातच भूषणने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोने साऱ्यांना जागं केलं आहे.
भूषणने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर केतकी नारायणबरोबरचे काही फोटो पोस्ट केले आहेत. हे केवळ फोटो नसून त्यांनी या फोटोसह दिलेल्या पोजने चर्चांना उधाण आलं आहे. भूषणने केतकीच्या पोटावर हात ठेवत मॅटर्निटी पोज देणारा फोटो शेअर केला आहे. आणि या फोटोसह कॅप्शन देत “आमच्याकडे एक गोड सरप्राईज आहे”, असं म्हटलं आहे. अभिनेत्याचा हा फोटो पाहून नक्की हे प्रकरण काय आहे असा प्रश्न साऱ्यांनाच सतावत आहे.
आणखी वाचा – काविळने घेरलं, सेटवर बेशुद्ध पडला आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या ४६ व्या वर्षी निधन, कलाकार हळहळले
भूषणची ही पोस्ट पाहून अनेकांनी यावर कमेंट करत नेमकं प्रकरण काय असा सवाल केला आहे. “Photo बघून नक्की काय ठरवायचं आहे लग्न झालं आहे की पोरं बाळ होणार आहे”, “एक मिनिट तुझं लग्न कधी झालं?”, “नवीन प्रोजेक्ट आहे ना?, खरं बोल. असा शॉक नको देऊ फॅन्सला”, अशा अनेक कमेंट या पोस्टवर आल्या आहेत. तर अनेकांनी दोघांचं अभिनंदन केलं आहे. आता फोटो दिसल्याप्रमाणे खरंच केतकी-भूषण गुडन्यूज देणार का?, की हे काही प्रमोशनल असावे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आता चाहत्यांना पडलेल्या या प्रश्नावर भूषण काय उत्तर देणार हे पाहणं रंजक ठरेल.





