‘कोकण कोहिनूर’ म्हणून ओळखला जाणारा सर्वांचा लाडका अभिनेता म्हणजे ओंकार भोजने. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोनंतर तो ‘हसताय ना, हसायलाच पाहिजे’ या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या शोमध्ये निलेश साबळे व भाऊ कदम यांच्यासह तो प्रेक्षकांना हसवण्याचे काम करत आहे. आपल्या निरागस विनोदी अभिनयाने त्याने आतापर्यंत सर्वांचीच मनं जिंकली आहेत. सामान्य प्रेक्षकांसह अनेक मोठमोठ्या कलाकारांच्या तो कौतुकास पात्र ठरला आहे. अशातच अभिनेते भरत जाधव यांनी ओंकारचे तोंडभरुन कौतुक केले असून त्याचं कौतुक करताना त्यांनी ओंकारला एक मौल्यवान भेटही दिली.
कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे ‘हसताय ना, हसायलाच पाहिज’च्या आगामी भागाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ओंकार भरत जाधव यांनी साकारलेली सर्व लोकप्रिय पात्र साकारताना दिसत आहे. ओंकार भोजनेने भरत यांच्या ‘सही रे सही’ आणि ‘श्रीमंत दामोदर पंत’ या नाटकातील त्यांची पात्र अगदी हुबेहुब साकारल्याचे या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. ओंकारला ‘मदन सुखात्मे’, ‘दामोदर पंत’, ‘दामू’ ही पात्रे साकारताना पाहून भरत खूपच भावुक झाले.
आणखी वाचा – नोकरदारांसाठी रविवारचा दिवस आहे खास, बढतीसह पगारातही होणार वाढ, तुमच्या नशिबात काय? जाणून घ्या…
त्यानंतर त्याचे कौतुक करण्यासाठी भरत जाधव त्यांच्या आसनावरुन उठून मंचावर येतात. मंचावर आल्यानंतर भरत जाधव ओंकारचे कौतुक करतात, त्याची गळाभेट घेऊन त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी ओंकारला काढून देतात. यानंतर ओंकार त्यांच्या पाया पडतो, तेव्हा भरत जाधव त्याला कडकडून मिठी मारतात आणि “ओंकार तू वरचा क्लास आहेस” असं म्हणत त्याला कौतुकाची थाप देतात. भरत यांच्याकडून मिळालेली ही कौतुकाची थाप पाहून मंचावरील सर्वांनाच सुखद धक्का बसतो आणि ओंकारही यामुळे भारावून गेल्याचे या प्रोमोमध्ये दिसत आहे.
दरम्यान, ‘हसताय ना, हसायलाच पाहिजे’ या शोमधून ओंकार भोजनेसह भाऊ कदम, स्नेहल शिदम, सुपर्णा श्याम, रोहित चव्हाण आदी कलाकारदेखील आहेत. हे कलाकार आता नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.