मराठमोळा अभिनेता अमेय वाघने आजवर त्याच्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. अमेयने आजवर मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतही महत्त्वपूर्ण कामगिरी करत स्वतःच असं स्थान निर्माण केलं आहे. नाटक, मालिका यांशिवाय अमेय वेबसीरिजमुळे चर्चेत राहिला. ‘असुर’ या मालिकेमुळे अमेय विशेष चर्चेत आलेला पाहायला मिळाला. अमेय सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असलेला पाहायला मिळतो. नेहमीच तो त्याच्या नवनवीन प्रोजेक्टची माहिती चाहत्यांना देत असतो. (Amey Wagh On Wife)
अशातच अमेयने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. ही खास पोस्ट त्याने त्याच्या पत्नीसाठी सोशल मीडियावरुन शेअर केली आहे. बायकोच्या वाढदिवसानिमित्त अमेयने खास फोटो शेअर करत ही पोस्ट शेअर केली आहे. अमेयने २०१७ मध्ये त्याची बालमैत्रीण व प्रेयसी साजिरी देशपांडे हिच्याशी पुण्यात लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर ही जोडी बरीच चर्चेत आलेलीही पाहायला मिळाली.
बायकोबरोबरचा खास फोटो शेअर करत त्याने, “प्रिय साजिरी. मी बाल्कनीतील झाडांना पाणी घालायचं विसरेन, कचरा बाहेर काढून ठेवायचं विसरेन, बाहेर जाताना बेडरुमची खिडकी बंद करायची विसरेन पण आठवणीने तुझ्या कानात माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणायचं कधीच विसरणार नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा गोंडस”, असं म्हणत तिला हटके शुभेच्छा दिल्या आहेत. अमेय वाघने शेअर केलेल्या या पोस्टवर ऋता दुर्गुळे, सखी गोखले, श्रेया बुगडे, गौरी नलावडे यांसारख्या अभिनेत्रींनी कमेंट करत त्याच्या बायकोला शुभेच्छा दिल्या आहेत.
मराठी सिनेसृष्टीसह अमेयने बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. अमेयने ‘मुरांबा’, ‘झोंबिवली’, ‘कारखानीसाची वारी’, ‘गर्लफ्रेंड’ यांसारख्या अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. तसेच त्याने काही हिंदी वेबसीरिजमध्ये देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय त्याच्या ‘जग्गू व ज्युलिएट’ चित्रपटाचीही विशेष चर्चा रंगली होती.