‘होम मिनिस्टर’ म्हटलं की आदेश बांदेकर यांची आठवण आल्यावाचून राहत नाही. संबंध महाराष्ट्रातील महिलावर्गाचे लाडके भावोजी म्हणून आदेश यांना ओळखलं जातं. याशिवाय आदेश बांदेकर यांची ओळख म्हणजे शिवसेना पक्षातील त्यांचा वावर. शिवसेना पक्षात कार्यरत असल्यापासून आदेश बांदेकर यांनी भरपूर काम केलं. मुंबईतील प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची धुराही त्यांनी सांभाळली. गेली अनेक वर्ष या कार्याअंतगर्त देशावर, राज्यावर वा मुंबईवर आलेल्या अनेक संकटांच्या काळात न्यासाने सढळ हस्ते मदतीचा हात पुढे केला. (Aadesh Bandekar Video)
महाराष्ट्र शासनाअंतर्गत येणाऱ्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास, व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला आहे. याबाबतची एक पोस्ट शेअर करत आदेश बांदेकर यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा जुना व्हिडीओ असून २०१९ साली जेव्हा त्यांची या पदासाठी निवड झाली होती तेव्हाचा हा व्हिडीओ आहे. यांत आदेश बांदेकर कर्मचाऱ्यांसह आनंद शेअर करताना दिसत आहे. यावेळी आदेश बांदेकर यांना अश्रूही अनावर झाले आहेत.
पोस्ट शेअर करत आदेश बांदेकर म्हणाले की, “क्षण आनंदाचा. २४ जुलै २०१७ रोजी कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘श्री सिद्धिविनायक मंदिर’ न्यासाचा अध्यक्ष म्हणून सेवा करण्याचा आशीर्वाद मला मिळाला आणि तिथून २३ जुलै २०२३ पर्यंतची ६ वर्षं अविस्मरणीय गेली. न्यासाच्या माध्यमातून, विश्वस्त मंडळाच्या सहकार्यातून अनेक चांगली कामं आणि भाविकांची सेवा करता आली. श्री सिद्धिविनायकाचा महिमा प्रत्यक्ष अनुभवता आला.”
“पण या साऱ्यातला सर्वोच्च आनंदाचा क्षण होता, सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे १२९ अस्थायी कर्मचारी जे अनेक वर्ष अल्प मानधनात काम करत होते, त्यांची नोकरी कायम व्हावी यासाठी पाठपुरावा करून त्यांना सेवेत कायम करण्याचा! २०१९ सालच्या अंगारक चतुर्थीचा तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही. हे काम मी केले नाही, श्री सिद्धिविनायकांनी करुन घेतले.”