‘क्वीन ऑफ हार्ट्स’ म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण करत मनीषा राणीने अनेकांच्या मनावर राज्य केल आहे. डान्स रिअॅलिटी शोद्वारे तिने अनेकांची मनं जिंकली आहेत. आपल्या नृत्यकौशल्याने बिहारमधून मुंबईच्या मायानगरीत आलेल्या मनीषाने ‘झलक दिखला जा ११’ मध्ये दमदार नृत्य सादर केले आणि या शोच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले.
मात्र या रिअॅलिटी शोविषयी मनीषाने नुकताच एक मोठा खुलासा केला आहे. नुकत्याच एका व्लॉगमध्ये मनीषा राणीने ‘झलक दिखला जा ११’ची विजेती झाली असूनही तिला जिंकण्याचे बक्षीस अद्याप मिळालेले नसल्याचे सांगितले आहे. एका व्लॉगमध्ये, मनीषा तिचा मित्र महेश केशवालाशी संवाद साधत होती. या संवादादरम्यान, तिने तिला ‘झलक दिखला जा ११’च्या विजेतेपदाची रक्कम मिळाली नसल्याचे म्हटले आहे.
या व्लॉगमध्ये, हे दोघं चहाचं दुकान उघडण्याबदद्ल बोलत असतात. तेव्हा मनीषा गंमतीत महेश ते दुकान सुरु करणार असल्याचे म्हणते. तेव्हा ठुगेश म्हणतो की “मनीषा ‘झलक दिखला जा ११’ जिंकली आहे. त्यामुळे तिनेच ते दुकान उघडावे.” यावर मनीषा त्याला उत्तर देत असं म्हणते की, “मला ‘झलक दिखला जा’च्या बक्षीसाची रक्कम अजून मिळालेली नाही. त्यातूनही ते अजून अर्धी रक्कम कापतील.”
मनीषा ‘झलक दिखला जा ११’ मध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. यावेळी तिने आपल्या जबरदस्त नृत्यकौशल्यामुळे ती या सीझनची विजेती झाली आणि या विजेतेपदासाठी तिला ३० लाख रुपयांचे बक्षीसही मिळाले. दरम्यान, मनीषाच्या या गंमती-जंमतीच्या या संवादातून रिअॅलिटी शोबद्दलचा अनोखा चेहरा समोर आला आहे.
आणखी वाचा – “माझे आई व वडील दोघंही आता नाहीत आणि…”, महेश मांजरेकर आई-वडिलांच्या आठवणीत भावुक, म्हणाले, “वाईट वाटतं की…”
काही दिवसांपूर्वी शिव ठाकरेनेही त्याच्या ‘बिग बॉस’च्या विजेतेपदाच्या रक्कमेतील अर्धे पैसे काढून घेतल्याबद्दल भाष्य केले होते. अशातच आता मनीषानेही तिला अद्याप ‘झलक दिखला जा ११’ची विजेत्याची रक्कम मिळाली नसल्याचे म्हटले आहे.