मनोरंजन सृष्टीतून एक अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे ती म्हणजे एका २१ वर्षीय अभिनेत्रीचे निधन झाले आहे. मल्याळम अभिनेत्री निकिता नायरचे निधन झाले. निकिता ही B.Sc सायकॉलॉजीची विद्यार्थिनी होती. आजारपणामुळे कोची येथील खासगी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिला विल्सन रोग नावाचा दुर्मिळ आजार होता. आजारपणामुळे त्यांच्यावर दोनदा यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करावी लागली. दुसऱ्या शस्त्रक्रियेनंतर एका आठवड्यानंतर तिचा मृत्यू झाला. (Nikita Nair passed away)
निकिता तिच्या महाविद्यालयीन जीवनात एक सक्रिय आणि प्रेरणादायी विद्यार्थिनी होती. तिच्या निधनामुळे महाविद्यालयात आणि तिच्या मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे. अनेकांनी तिच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. तिच्या कुटुंबियांनाही निधनाने मोठा धक्का बसला आहे शिवाय अभिनेत्रीची आई नमिता माधवनकुट्टी आणि वडील डॉनी थॉमस यांनाही लेकीच्या जाण्याने मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ०८ वाजल्यापासून एडप्पल्ली नेताजी नगर येथील तिच्या घरी तिचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर निकिताच्या पार्थिवावर कोची येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान, निकीता ही ‘मेरिकुंडोरू कुंजाडू’ चित्रपटातील बालकलाकार आहे आणि सेंट तेरेसा कॉलेजची माजी अध्यक्षादेखील होती. त्यामुळे तिच्या निधनाचे वृत्त येताच अनेकांनी दु:ख व्यक्त केलं आहे. सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत त्यांनी निकिताच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे.