केंद्र सरकारने २५ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे. या पुरस्कारांमध्ये देशातील विविध ठिकाणी आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गजांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येच्या भाषणानंतर या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. पुरस्कारांमध्ये स्वातंत्र्यसैनिक, शेतकरी आणि पॅरालिम्पियनमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे. महाराष्ट्रातील तीन जणांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. देशाच्या इतरही भागातील वेगवेगळ्या क्षेत्रात अनोखे काम करणाऱ्यांची पद्म पुरस्कारासाठी निवड केली आहे. (Sonu Nigam displeasurement on Padma awards)
लोक गायिका शारदा सिन्हा यांना पद्मविभूषण मरणोत्तर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अभिनेते अनंत नाग, दाक्षिणात्य अभिनेते नंदामुरी बालकृष्ण आणि अजित कुमार, गायक पंकज उदास यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. गायक अरिजित सिंगलाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अशातच पद्म पुरस्कार जाहीर झाल्यानंतर गायक सोनू निगमने नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत त्याने नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय कुणाकुणाला पुरस्कार मिळाले पाहिजेत याबद्दल त्याचं मत व्यक्त केलं आहे.
सोनू निगमने व्हिडीओ शेअर करत म्हटले की, “असे दोन गायक ज्यांनी जगभरातील गायकांना प्रेरणा दिली आहे. यापैकी एकाला तर फक्त आपण पद्मश्रीपुरते मर्यादित ठेवले आहे. ते म्हणजे मोहम्मद रफी साहेब. आणि एक असे आहेत की ज्यांना पद्मश्री देखील मिळाले नाही, ते म्हणजे किशोर कुमार जी. आता जे आहेत, त्यांच्यामध्ये अलका याज्ञिक यांची मोठी आणि आश्चर्यकारक कारकीर्द आहे, त्यांना आजपर्यंत काहीही मिळालेले नाही”.
यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “श्रेया घोषाल अनेक दिवसांपासून आपली कला सिद्ध करत आहे. तिलाही पुरस्कार मिळायळा हवा. सुनिधी चौहान, तिनेही संपूर्ण पिढीला प्रेरणा दिली आहे. मात्र तिलाही अद्याप काहीही मिळालेले नाही. अजून अशी किती नावे आहेत?, मग ती कोणत्याही क्षेत्रातली असो, अभिनय असो की विज्ञान असो, ज्यांना न्याय मिळाला नाही असे तुम्हाला वाटते?”