साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. मल्याळम अभिनेत्री लक्ष्मीका सजीवन हिचं वयाच्या २४व्या वर्षी निधन झालं आहे. शुक्रवारी संयुक्त अरब अमिरातीतील शारजाह येथे हृदयविकाराच्या झटक्याने अभिनेत्रीचं निधन झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. या बातमीने साऊथ चित्रपटसृष्टीला खूप मोठा धक्का बसला आहे. साऊथ इंडस्ट्रीतील तरुण अभिनेत्री लक्ष्मीका सजीवन तिच्या अभिनय कौशल्यासाठी ओळखली जायची. लक्ष्मीका सजीवनने साऊथ फिल्म इंडस्ट्रीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. (Lakshmika Sajeevan Passes Away)
अभिनेत्रीच्या निधनाच्या वृत्तामुळे मल्याळम इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. लक्ष्मीका शारजाहमधील एका बँकेत काही कामानिमित्त गेली होती त्यावेळी तिचं निधन झालं, असं सांगण्यात येत आहे. लक्ष्मीका सजीवनला मल्याळम शॉर्ट फिल्म ‘कक्का’ मधून खरी ओळख मिळाली. यांत तिने पंचमीची मुख्य भूमिका साकारून सर्वांची मनं जिंकली होती. यातील तिच्या अभिनायचंही प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं.
‘कक्का’ या लघुपटात तिने गरीब मुलीची भूमिका साकारली होती आणि या चित्रपटातील भूमिकेमुळे लक्ष्मीकाला खरी ओळख मिळाली. ‘कक्का’चे दिग्दर्शन अजू अजेश यांनी केले होते. या चित्रपटात लक्ष्मीका सजीवन व्यतिरिक्त गंगा सुरेंद्रन, सतीश अंबाडी, श्रीला नलेदम व विपिन नील यांचाही समावेश होता. ओटीटीवर या चित्रपटाला ६ दशलक्षहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ‘कक्का’ हा लघुपट १४ एप्रिल २०२१ रोजी प्रदर्शित झाला.
लक्ष्मीका सजीवनने ‘पुझायम्मा’, ‘पंचवर्नाथथा’, ‘सऊदी वेल्लक्का’, ‘उयारे’, ‘ओरु कुट्टनाडन ब्लॉग’, ‘ओरु यमंदन प्रेमकथा’ व ‘नित्यहरिथा नायगन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. प्रशांत बी मोल्लिकल दिग्दर्शित ‘कून’ या चित्रपटात ही अभिनेत्री शेवटची दिसली होती. ‘पुझायम्मा’ चित्रपटात देवयानीच्या शिक्षिकेच्या भूमिकेसाठी प्रेक्षकांकडून तिची प्रशंसा करण्यात आली. हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि विजेश मणी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.