मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय नाव म्हणजे महेश मांजरेकर. महेश मांजरेकरांनी आजवर अनेक चित्रपटांचे यशस्वी दिग्दर्शन करत मराठी चित्रपटप्रेमींना अनेक चित्रपटांची मेजवानी दिली आहे. मराठीसह हिंदी व दाक्षिणात्य सिनेसृष्टीत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. केवळ दिग्दर्शनचं नव्हे तर अनेक चित्रपटांत त्यांनी अभिनयही केला आहे.
मराठीसह हिंदी व दाक्षिणात्य भाषांतील अनेक चित्रपटांत त्यांनी दमदार भूमिका साकारत मनोरंजन केले आहे. त्यामुळे त्यांच्या दमदार अभिनयाचा मोठा चाहता वर्ग आहे. अशातच आता ते एका नवीन भूमिकेतून सर्वांसमोर येत आहेत. ते म्हणजे गायकाच्या… महेश मांजरेकर त्यांच्या आगामी ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटातून गायकाच्या भूमिकेतून सर्वांच्या भेटीला येत आहेत.
महेश मांजरेकरांच्या ‘जुनं फर्निचर’मधील एक भावपूर्ण गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘काय चुकले सांग ना?’ असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणं वैभव जोशी यांनी शब्दबद्ध केले आहे. तर डीएच हार्मोनी एसआरएम एलियन यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे आणि या गाण्याची विशेष गोष्ट म्हणजे या गाण्याला खुद्द महेश मांजरेकर यांचा आवाज लाभला आहे.
या गाण्याबद्दल महेश मांजरेकरांनी आपल्या भावना व्यक्त करत असं म्हटलं आहे की, “या गाण्याच्या प्रत्येक शब्दांत अर्थ दडलेला असून हे गाणे मनाचा ठाव घेणारे आहे. हे गाणे मला गायला मिळाले, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. मनातील घालमेल त्याचबरोबर मनाला मिळणारी उभारी अशा दोन्ही भावना या गाण्यात आहेत. चित्रपटाची कथा पुढे नेणाऱ्या या गाण्याला संगीत टीमही तितक्याच ताकदीची लाभली आहे.”
दरम्यान, ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद व दिग्दर्शन महेश मांजरेकरांनी केले असून यात त्यांच्यासह मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकरी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.