‘I am a गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा, टा ना ना ना…’ या वाक्याने अनेकांच्या मनात आपली एक वेगळी जागा निर्माण करणारा विनोदी अभिनेता म्हणजे गौरव मोरे. छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोमधून गौरवला चांगलीच लोकप्रियता मिळाली. या शोमधून त्याने अनेक स्किट्सद्वारे प्रेक्षकांना हसवण्याचे काम केले. आपल्या विनोदाच्या अनोख्या शैलीने त्याने अवघ्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील काही कलाकारांनी हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवला आहे. प्रियदर्शिनी इंदलकर व वनिता खरात यांनी हिंदी सिनेविश्वात काम केले. यांच्यापाठोपाठ आता या शोमधील आणखी एका अभिनेत्याची हिंदी कॉमेडी शोमध्ये वर्णी लागली आहे आणि तो म्हणजे गौरव मोरे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर हा अभिनेता ‘मॅडनेस मचाएंगे’ या कॉमेडी शोद्वारे हिंदी प्रेक्षकांचे मनोरंजन करायलादेखील सज्ज झाला आहे.
‘मॅडनेस मचाएंगे’ या हिंदी कॉमेडी शोचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता कुशल बद्रिके, अभिनेत्री हेमांगी कवी यांच्यासह गौरव मोरेही कॉमेडी करताना पाहायला मिळत आहे. ‘सोनी टीव्ही’च्या इन्स्टाग्राम पेजद्वारे कुशल, हेमांगी व गौरव यांच्या स्किटचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडीओखाली गौरवच्या अनेक चाहत्यांनी त्याचे कौतुक केले आहे. तसेच त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत. “गौरव, कुशल, हेमांगी तुमचा अभिमान वाटतो, गौरव तू खूप भारी आहेस, गौरव मोरे तूला खूप खूप प्रेम” अशा अनेक कमेंट्स करत त्याचे कौतुक केले आहे. दरम्यान, अनेकांनी त्याला हास्यजत्रा शो सोडू नये असा सल्लाही दिला आहे. अनेकांनी “गौरव मोरे महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडू नको, भाई तू महाराष्ट्राची हास्यजत्रेतच भारी दिसतो” अशा कमेंट्स केल्या आहेत.