मराठी कलाक्षेत्रात सध्या एकामागोमाग एक येणाऱ्या निधनाच्या बातम्यांमुळे सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली आहे. ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं आकस्मित निधन झाल्याच्या बातमीने साऱ्यांना धक्का बसला. या बातमी नंतर लगेचच आणखी एका बातमीने सिनेसृष्टी हळहळली. ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांच्या आई सरोज उर्फ जेनमा कोठारे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्य-चित्रपट निर्मात्या सरोज कोठारे यांनी वयाच्या ९३व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. (Mahesh Kothare Mother Passes Away)
प्रायोगिक रंगभूमीच्या ओढीने सरोज व अंबर कोठारे यांची पहिल्यांदा भेट झाली. त्यानंतर त्यांनी १९५२ मध्ये लग्नसोहळा उरकला. त्यानंतर सरोज आणि अंबर कोठारे यांनी कलेवरील प्रेमापोटी आर्टिस्ट कंबाईन नावाची संस्था सुरु केली. ‘लग्नाची बेडी’, ‘झोपी गेलेला जागा झाला’ या नाटकात सरोज आणि अंबर कोठारे यांनी एकत्र काम केले होते. महेश कोठारे यांच्या डॅम इट आणि बरंच काही या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या काही महिन्यांनंतर महेश कोठारे यांचे वडील अभिनेते अंबर कोठारे यांचे देखील निधन झाले.
महेश कोठारे यांच्या सिनेसृष्टीतील पदार्पणासाठी महेश यांच्या आई सरोज कोठारे यांनी विशेष मेहनत घेतली. महेश कोठारे यांनी बालकलाकार म्हणून हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केला, त्या चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान सरोज या कायम महेश यांच्याबरोबर सतत असायच्या.
उर्मिला कोठारेने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पोस्ट शेअर करत सरोज कोठारे यांच्या निधनाची माहिती दिली. तिच्या या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी सरोज कोठारे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
