कलाकार मंडळी म्हटलं की त्यांचे चाहते हे आलेच. प्रत्येक कलाकाराचा चाहतावर्ग असतो. नेहमीच हे कलाकार त्यांच्या चाहत्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात राहतात. असे अनेक चाहते आहेत जे आजही कलाकारांच्या प्रेमापोटी त्यांना भेटण्यासाठी अगदी जीवाचं रान करतात. यांत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे असंख्य चाहते आहेत. हास्यजत्रेतील प्रत्येक कलाकारांनी आजवर त्यांच्या अभिनय शैलीने स्वतःचा असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. (Namrata Sambherao Fan Moment)
नम्रताने फॅन मुमेंट सांगताना एक किस्सा सांगितला की, “अमेरिका दौरा करत असताना टिळक कुटुंब हे अमेरिकेतील मोठं प्रस्थ आहे. त्यांनी मला खूप प्रेम दिलं. शिवाय त्यांच्या पत्नीने मला सुंदर असं पत्र लिहिलं होतं. आणि ते पत्र वाचताना मला अक्षरशः रडू आलं होतं. प्रेक्षक आपल्यावर किती प्रेम करतात, आपल्या बारीक बारीक गोष्टींकडे त्यांचं कसं लक्ष असतं, त्या गोष्टी टिपून जेव्हा ते आपल्याला सांगतात तेव्हा खूप भारी वाटतं”.
नम्रता पुढे म्हणाली, “एकदा ट्रेनमधून प्रवास करताना एक बाई भेटल्या, त्या म्हणाल्या माझ्या हृदयाला होल आहे. मात्र जेव्हापासून मी ‘हास्यजत्रा’ पाहायला लागले तेव्हापासून मी फक्त एन्जॉय करत आहे. मी आजारी आहे याचा विचार करणं मी बंद केलं आहे. मी तुम्हाला बघून खूप आनंदी राहते, आणि त्यात मला समाधान ही मिळतं”.
पुढे नम्रता एक फॅन मुमेंट सांगत म्हणाली, ‘एक आठ वर्षांचा लहान मुलगा माझा फॅन आहे. वाईट वाटतं की तो आज आपल्याबरोबर या जगात नाही. तो खुप मोठा फॅन होता आमचा. लांब कुठल्यातरी गावात ते राहतात पण त्याची आई त्याला घेऊन आमची भेट घडवण्यासाठी पुण्यापर्यंत त्याला घेऊन आली होती. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की, याचे आता काहीच दिवस आहेत. त्याला कोणतातरी आजार होता ज्यात त्याच्या शरीराची ओबडधोबड वाढ होत होती. त्यामुळे डॉक्टरांनी हा फार काळ जगू शकत नाही याची पूर्वकल्पना आधीच दिली होती. त्याला जेव्हा भेटले तेव्हा त्याने मला माझ्या लॉली या पात्राचा अभिनय, शिक्षिका या पात्राचा अभिनय करून दाखवल्यावर मी भारावून गेले”.