नव्वदीच्या काळात मराठीतील काही सर्जनशील व नावीन्यपूर्ण दिग्दर्शन करणाऱ्या काही मोजक्या दिग्दर्शकांपैकी आघाडीचे दिग्दर्शक म्हणजे महेश कोठारे. त्यांनी नवनवीन कल्पना साकारत अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांच्या अशाच अनेक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे ‘धडाकेबाज’. त्याकाळी या चित्रपटातील गंगाराम व कवट्या महाकाळ या भूमिका सर्वाधिक गाजल्या. (Mahesh Kothare Shared Story Of ‘Ganagaram’ In Dhadakebaaj Marathi Movie)
या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या दुहेरी भूमिका होत्या. त्यापैकी एक लक्ष्या व दुसरी बाटलीतला गंगाराम. चित्रपटात लक्ष्याला एक जादूची बाटली मिळते. त्या बाटलीत असतो तो गंगाराम आणि त्या गंगारामकडे असते ती जादूची रेती. ही रेती वापरून गंगाराम लक्ष्या व त्याच्या मित्रांची मदत करतो. पण या चित्रपटातील एक गूढ अजूनही उलगडलेलं नाही ते म्हणजे बाटलीतला गंगाराम. हा गंगाराम बाटलीत गेला कसा? याचे रहस्य आजूनही उलगडलेले नाही. यामागची नेमकी काय कहाणी आहे? हे जाणून घेऊयात.
‘बाटलीतला गंगाराम’ यामागची कहाणी थोडी रंजकच आहे. महेश यांनी एका मुलाखतीत त्यांच्या या बाटलीतल्या गंगारामचं रहस्य उलगडलं आहे. या गंगारामला बाटलीत टाकण्यासाठी अर्थात व्ही.एफ.एक्स.चे तंत्र शिकण्यासाठी महेश कोठारे अमेरिकेला गेले होते आणि यासाठी त्यांना तब्बल एक वर्षाचा कालावधी लागला होता. अमेरिकेतील ‘ट्वेन्टी सेंच्युरी ऑफ फॉक्स’ या स्टुडिओमध्ये त्यांनी एक महिना कामदेखील केले होते.
दरम्यान त्यांना या स्टुडिओमध्ये जाण्याची संधी मिळाली ती दिग्दर्शक रवी चोप्रा यांच्यामुळे. ‘बर्निंग ट्रेन’ या चित्रपटाच्या निमित्ताने अमेरिकेचे व्ही.एफ.एक्स.चे काही तंत्रज्ञ भारतात आले होते. यावेळी ट्वेन्टी सेंच्युरी ऑफ फॉक्समधील व्ही.एफ.एक्स. स्टुडिओचे दिग्दर्शक पॉल हेदेखील आले होते. तेव्हा पॉल यांच्याकडून व्ही.एफ.एक्सचे तंत्र शिकण्यासाठी महेश यांनी दिग्दर्शक रवी चोप्रांद्वारे पॉल यांच्याशी संवाद साधला. यावर पॉल यांनी महेश यांना अमेरिकेला येण्यास सांगितले. त्यानंतर व्ही.एफ.एक्स.चे अद्ययावत तंत्रज्ञान शिकण्यासाठी महेश यांनी अमेरिकेत १ वर्षे प्रशिक्षण घेतले.
त्यावेळी अमेरिकेत व्ही.एफ.एक्स.साठी निळा पडदा वापरून चित्रपट शूट केले जात होते. त्यामुळे महेश यांनादेखील त्यांच्या बाटलीतला गंगाराम साकारण्यासाठी व्ही.एफ.एक्स.च्या एका विशिष्ट पद्धतीच्या इंटरमिडीएट निगेटिव्हची गरज होती. पण बाजारात त्या विशिष्ट पद्धतीच्या निगेटिव्हची कमतरता होती आणि बाहेरून ते आयात करायचे असल्यास अधिक प्रमाणात मागवावे लागत होते. तेव्हा महेश यांनी ‘अजूबा’ चित्रपटाचे दिग्दर्शक पीटर परेरा यांच्याशी बोलून विशिष्ट निगेटिव्ह आयात करण्यात आले. त्यापैकी पीटर यांनी काही निगेटिव्हचा वापर करुन अजूबा चित्रपट साकारला तर काही निगेटिव्हचा वापर करुन महेश यांनी धडाकेबाज चित्रपटातील ‘बाटलीतला गंगाराम’ साकारला.