‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकर हा त्याच्या विनोदी अभिनयामुळे कायमच चर्चेत असतो. प्रसाद हा उत्तम अभिनेता तर आहेच. पण तो उत्तम लेखक व दिग्दर्शकही आहे. आपल्या विनोदी स्किट्समुळे चर्चेत राहणाऱ्या प्रसादची सध्या सोशल मीडियावरदेखील तितकीच चर्चा सुरू आहे. याचं कारण म्हणजे प्रसादचं नवीन घर. काही दिवसांपूर्वीच प्रसादने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे नवीन घराचे फोटो शेअर केले होते. प्रसाद आता नवीन घरात राहायला गेला आहे. त्याने मुंबईत घर नेमकं का घेतलं? यामागचं कारण आता समोर आलं आहे. (Prasad Khandekar New Home)
मुंबईत घर घेणं हे प्रसादचं स्वप्न होतं. अधिकाधिक मेहनत करत त्याने त्याचे स्वप्न पूर्ण केलं आहे. विशेष म्हणजे प्रसादचं हे तिसरं घर आहे. त्याला हे नवीन घर शोधायला १ वर्ष, घर बांधायला ६ महीने, घर सजवायला २ महीने लागले आणि शेवटी नवीन घरात शिफ्ट झाल्याचे त्याने सांगितले. त्याचबरोबर प्रसादने “दोन्ही जुन्या घरांनी भरभरून दिलं” असं म्हणत त्याच्या दोन्ही जुन्या वास्तूंचे आभारदेखील मानले.
प्रसादच्या नवीन घराच्या पुजेला ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रे’तील अनेक कलाकारांनी त्याला शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली होती. याबरोबरच त्याच्या कुटुंबीयातील अनेक सदस्य सुद्धा उपस्थित होते. प्रसाद खांडेकरने शेअर केलेल्या फोटोमध्ये, त्याची बायको, मुलगा, आईसह इतर कुटुंबीयदेखील दिसत आहेत. ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटानिमित्त ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने नवीन घर का घेतलं? याचं कारण स्पष्ट केलं आहे.
प्रसादने घेतलेलं हे नवीन घर निसर्गाच्या कुशीत आहे. सकाळी उठल्यावर जंगल दिसावं, पक्ष्यांचा थवा दिसावा अशा निसर्गरम्य ठिकाणी घर घ्यायचे प्रसादचे स्वप्न होते आणि या घराच्या निमित्ताने त्याचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. प्रसादच्या या नवीन घराचे नेमके ठिकाण अद्याप कळलेले नाही. मात्र तो त्याच्या या नवीन घरामुळे खूपच खुश आहे. नवीन घराबरोबरच प्रसादचे आणखी एक स्वप्न पूर्ण झाले आहे आणि ते म्हणजे दिग्दर्शक होण्याचे. लवकरच प्रसादचा ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हा त्याने दिग्दर्शित केलेला हा पाहिलावहिला मराठी चित्रपट आहे. त्यामुळे त्याच्या आगामी चित्रपटासाठी तो खूपच उत्सुक आहे आणि त्याच्या चाहत्यांनादेखील या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.