‘भांडुपचा शशी कपूर’ अशी आपली वेगळी ओळख निर्माण करत अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय झालेला विनोदी अभिनेता म्हणजे निखिल बने. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. त्यापैकीच एक म्हणजे निखिल बने. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून लोकप्रियता मिळवल्यानंतर निखिल मोठ्या पडद्यावरही धुमाकूळ घालताना दिसला. (Nikhil Bane Post)
सोशल मीडियावरही निखिल बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच निखिलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टमध्ये निखिलने त्याच्या चाहत्यांडकडे मदतीसाठी हात पुढे केला आहे. मात्र ही मदत इतर कोणासाठी तरी असल्याचं त्याने म्हटलं आहे. कलाकार मंडळी त्यांच्या परीने अनेकदा गरजूंना मदत करत असतात.

कित्येक कलाकार या गरजूंच्या मदतीसाठी सोशल मीडियावरुन आवाहनही करायला मागे पुढे पाहत नाहीत. अशातच निखिलने आता त्याची काकी आजारी असल्याचं म्हणत त्यांच्या आजारपणासाठी शक्य असल्यास मदत करण्याचं आवाहन केलं आहे. निखिलने घेतलेला हा पुढाकार पाहून नेटकऱ्यांच्या मनात त्याच स्थान उंचावलं आहे. निखिलच्या साधेपणाचं नेहमीच कौतुक केलं जातं. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे निखिलला प्रसिद्धी मिळाली असली तरी त्याने कधीच या प्रसिद्धीचा गैरवापर केलेला नाही. कायमच तो प्रेक्षकांचं मन जिंकताना दिसतो.
निखिलने आता इन्स्टाग्राम अकाउंटवर स्टोरी शेअर करत “नमस्कार. माझी काकी सुजाता बने एका आजाराशी झुंज देत आहे आणि त्यासाठी येणारा खर्च ते पुरवू शकत नाही आहेत. तर मी तुम्हाला विनंती करतो की, जर कोणाला काही मदत करता आली तर मी दिलेल्या लिंकवर शक्य असल्यास मदत करावी”, असं म्हणत मदतीसाठी आवाहन केलं आहे.