कोकणात गणेशोत्सवाची अनोखी धामधूम पाहायला मिळते. कोकणात गणेशाच्या आगमनाची एक वेगळीच मज्जा मस्ती असते. मुंबईहून चाकरमानी कोकणात जातात, गणेशोत्सवासाठी गावाकडे येण्याची ओढ त्यांना लागून राहिलेली असते. मराठी मनोरंजनविश्वात अशी बरीच कलाकार मंडळी आहेत जी कोकणातली आहेत. कोकणात जाऊन तेथील बरेच फोटोस व्हिडीओ ते नेहमीच सोशल मिडीयावरून शेअर करत असतात. चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेले असताना एका मराठमोळ्या कलाकाराने खंत व्यक्त केली आहे. (Nikhil Bane On Ganeshotsav)
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता निखिल बने हा मूळचा कोकणातला. कोकणातील चिपळूण हे त्याचे गांव. त्याच्या गावातील अनेक फोटोस, व्हिडीओ तो नेहमीच सोशल मीडियावरून शेअर करत असतो. बरेचदा तो कुटुंबीयांबरोबर त्याच्या कोकणातल्या घरी जात असतो. दोन दिवसांपूर्वी निखिल बनेने त्याचे कुटुंबीय कोकणात जात असल्याचा एक व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला होता. या व्हिडीओत त्याचे कुटुंबीय चिपळूणला जायला निघालेले पाहायला मिळाले होते. मात्र यंदा निखिल स्वतः कोकणात जाणार नसल्याचं ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना निखिल म्हणाला, “बाप्पाबरोबरची आठवण म्हणजे दरवर्षी मी गणपतीला कोकणात असतो. क्वचितच मी मुंबईत आहे असं होतं. यावर्षी मला गणपतीला कोकणात जायला जमणार नाही. आताही निघताना माझ्या घरी गावी जायची तयारी सुरु होती. माझे आई-वडील गावी जातात. मी एकटाच गावी जात नाही. कारण मला सुट्टी नाही. त्यामुळे गावाला जाता येत नाही, याचं खूप वाईट वाटतंय”, असे निखिल म्हणाला.
यापुढे बोलताना, “गावच्या आठवणी, गावचे गणपती ही सर्व धमाल मी मिस करणार आहे. पण ठीक आहे. कामामुळे कधीकधी आपल्याला जाता येत नाही. पण पुढच्या वर्षी मी नक्की जाईन आणि त्यावेळीच्या गंमतीजमती मी तुम्हाला सोशल मीडियाद्वारे नक्की सांगेन”, असेही त्याने मुलाखतीदरम्यान सांगितलं.