छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी शो म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या शोमुळे अनेक नवोदित कलाकारांना एक वेगळी ओळख मिळाली. त्यापैकीच एक विनोदी अभिनेत्री म्हणजे ईशा डे. हास्यजत्रेमधील अनेक स्किट्समध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत ईशा प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. शोमधील विविधांगी व्यक्तिरेखा साकारत ईशाने प्रेक्षकांच्या मनावर आपलं अधिराज्य गाजवलं आहे.
एकांकिका, नृत्य, व्यावसायिक नाटक, मालिका, वेब सीरिज अशा विविध माध्यमांमध्ये तिनं आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. विनोदी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईशाने आजवर अनेक भूमिका साकारल्या आहेत. तसेच तिने तिचे शिक्षण लंडनमध्ये केले असून तिच्या संपूर्ण प्रवासाविषयी ईशाने ईस्ट मज्जाबरोबर खास संवाद साधला. आज जागतिक महिला दिनानिमित्त ईशाने ‘इट्स मज्जा’बरोबर साधलेल्या संवादात तिचे शिक्षण, तिच्या अभिनयाची कारकीर्द तसेच महिला म्हणून या क्षेत्राविषयी तिला काय वाटतं? याबद्दल तिने आपले मत मांडले. यावेळी वजनामुळे आपल्याला कायम आईच्या भूमिकांसाठी विचारण्यात येत असल्याची खंत ईशाने व्यक्त केली.
यावेळी ईशा असं म्हणाली की, “वजनाबद्दल मी असं सांगेन की, वजनामुळे काही मर्यादा येतात. कास्टिंगच्यावेळी वजनामुळे वय जास्त दिसतं. त्यामुळे माझ्यासाठी वजनाचा संघर्ष कायमच राहिला आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये जास्त वयाच्या भूमिका केल्यामुळे मला आता सतत आईच्या भूमिकांसाठी विचारणा होत आहे.”
यापुढे ईशाने असं म्हटलं की, “पण एका पॉइंटवर आपल्याला स्वत:साठी भूमिका घ्यावी लागते. मी आता ज्या वयाची आहे, त्या वयाची व्यक्ती जाड असू शकते. त्यामुळे मला त्या वयाच्या भूमिका मिळू शकतात. त्यामुळे मी आता ते थांबवलं आहे. माझं वजन माझ्यामुळेच जास्त आहे. पण मी माझं वजन कमी करेन तेव्हा मला नक्कीच चांगल्या भूमिका मिळतील आणि मला आणखी नवीन संधी मिळतील हे मला माहीत आहे.”
आणखी वाचा – अमृता खानविलकरला ‘या’ तीन व्यक्तींशिवाय जमेना, आईही सतत असते पाठिशी, म्हणाली, “माझ्यासाठी संपूर्ण जग…”
दरम्यान, ईशाने लंडनमधून अभिनयाचे शिक्षण घेतले आहे. तिने मालिकांमध्येही काम केलं आहे. याआधी तिने ‘सुखी माणसाचा सदरा’ व ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ या मालिकांमध्ये ती दिसली होती. बॉबी देओलच्या ‘आश्रम ३’ या वेब सीरिजमध्येही ईशा झळकली होती. तसेच तिने युट्यूबवरील काही सीरिजमध्येही अभिनय करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.