Anupam Kher On Maha Kumbh 2025 : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे १३ जानेवारीपासून महाकुंभ मेळा सुरु होत आहे. देशभरातून आणि जगभरातून लाखो लोक संगम नगरी पोहोचून महाकुंभात पवित्र स्नान करत आहेत. त्याचबरोबर बॉलीवूड कलाकार देखील महाकुंभसाठी खूप उत्सुक दिसत आहेत. अनेक बॉलिवूड कलाकारांनी या महाकुंभ मेळ्याला हजेरी लावलेली पाहायला मिळाली. अलीकडेच ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनीही महाकुंभ मेळ्याला हजेरी लावली. यावेळी त्यांनी संगमात पवित्र स्नान केले. यादरम्यान अभिनेते खूप भावूक दिसले. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओही शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांच्या पसंतीस पडला आहे.
अभिनेते अनुपम खेर यांनी बुधवारी प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभदरम्यान त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर त्याच्या पवित्र स्नानाची एक झलक शेअर केली आहे. व्हिडीओमध्ये अनुपम एका आध्यात्मिक क्षणी देवाची प्रार्थना करताना आणि मंत्रांचा जप करताना दिसत आहेत. अभिनेत्याने त्याच्या आयुष्यातील हा भावनिक क्षण असल्याचे वर्णन केले आणि म्हटले की त्याचे आयुष्य आता यशस्वी झाले आहे.
व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिले की, “महाकुंभात गंगा स्नान केल्यावर जीवन सफल झाले. आई गंगा, जमुना जी आणि सरस्वती जी भेटतात त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर पहिल्यांदा मंत्राचा जप केला. तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू आले. एक वर्षापूर्वी सनातन धर्माच्या स्थापनेच्या दिवशी ही प्रार्थना सुरु झाली”. अनुपम मंगळवारी महाकुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी प्रयागराजला पोहोचले होते. विमानतळावरुन बाहेर पडल्यानंतर खेर यांनी ANI शी बोलताना आध्यात्मिक मेळाव्याला उपस्थित राहिल्याबद्दल उत्साह व्यक्त केला.
आणखी वाचा – प्रसिद्ध गायिका मोनाली ठाकूरची लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान बिघडली तब्येत, श्वास घेण्यासाठी त्रास, रुग्णालयात दाखल
याबाबत ते म्हणाले, “मी येथे या अध्यात्मिक मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आलो आहे. येथे सर्व स्तरातील लोकांना पाहून खूप छान वाटतं. जबाबदारीने आणि सुरक्षित पद्धतीने हा ऐतिहासिक उत्सव आयोजित केल्याबद्दल मी उत्तर प्रदेश सरकार आणि मुख्यमंत्री योगी यांचे आभार मानतो. मी आदित्यनाथ यांचेही कौतुक करतो”.