Girish Oak marriage : नाटक, मालिका, चित्रपट यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते गिरीश ओक नेहमीच चर्चेत राहिले. गिरीश ओक सध्या ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत गिरीश ओक महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकत आहेत. त्यांच्या अभिनयाबाबत साऱ्यांना ठाऊक आहे पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत फार कमी जणांना ठाऊक असेल. गिरीश ओक यांनी २००८ साली दुसरं लग्न केलं. या लग्नाबाबत फार चर्चा झाली आणि झालीही असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. कुटुंबाचा विरोध पत्करुन त्यांना पल्लवी ओक यांच्याशी लग्न करण्याचा मोठा निर्णय घेतला. गिरीश ओक यांनी पाटणी पल्लवी ओक यांच्याबरोबर ‘आम्ही सारे खवय्ये- जोडीचा मामला’ या संकर्षण कऱ्हाडेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी त्यांचं कसं जुळलं याबाबत भाष्य केलं.
नुकताच या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये संकर्षणच्या हातात छोटीशी बस असून तो त्यांना त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल विचारतो. त्यावर गिरीश ओक म्हणतात, “मी आणि ती एकाच बसमध्ये बसलेलो होतो. पहिली भेट आमची बसमध्ये झाली”. पुढे संकर्षणने “पण त्या बसमध्ये काही संवाद घडला की नेमकं काय घडलं?”, असं विचारलं. त्यावर गिरीश यांच्या पत्नी म्हणाल्या, “आम्ही पुणे ते मुंबई प्रवास करीत होतो आणि मी आधीच बसमध्ये बसले होते आणि कर्वे रोडला गिरीश आला. मी त्याला पाहिलं तेव्हा म्हटलं की, डॉ. गिरीश ओक बसने वगैरे कसा प्रवास करतायत”.
पल्लवी ओक पुढे म्हणाल्या, “बसमध्ये आमच्या ज्या सीट होत्या, त्यात माझी सीट पुढे आणि त्याच्याच मागे त्याची सीट होती. लोणावळ्याला जेव्हा बस थांबली तेव्हा त्याच्या शेजारी एक, माझ्या शेजारी एक आणि आमच्या सीटच्या त्या बाजूला एका कुटुंबाच्या सीट होत्या, तर मला त्या बसच्या अटेंडंटने विचारलं की, तुम्हाला मागे बसायला आवडेल का, मी म्हटलं मला आवडेल; पण जे तिथे जे बसलेत त्यांना चालणार आहे का? त्यांनी मग गिरीशला विचारलं, तर तो म्हणाला ओके”.
पल्लवी पुढे त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल म्हणाल्या, “त्यावेळी आमच्यात काही बोलणं झालं नाही. पण, मी माझ्या मैत्रिणीला फोनवर म्हटलं, तुला माहितीये का माझ्या शेजारी कोण बसलंय. ती म्हणाली, काय आहे कोण बसलंय उगाचंच काहीतरी. तर मी म्हटलं की, अगं डॉक्टर गिरीश ओक आहेत माझ्या शेजारी. तीपण एकदम शॉक झाली आणि म्हणाली, तू बोललीस का त्यांच्याशी? म्हटलं नाही अजून तरी नाही. फक्त मुंबईत वांद्रे येथे आल्यानंतर का माहीत, मी त्याला म्हटलं की, मला तुमचा फोन नंबर मिळेल का? आणि त्यानं नंबर दिला मला”.
आणखी वाचा – अखेर फराह खानने केला कुक दिलीपच्या सॅलरीचा खुलासा, १० वर्षांपूर्वी होता २०,००० पगार, आता…
वाहिनीने शेअर केलेल्या अजून एका व्हिडीओमध्ये संकर्षण गिरीश ओक व पल्लवी यांच्या लग्नाचा फोटो दाखवताना दिसतो. त्यावर गिरीश ओक म्हणतात. “अरे वा.. लग्नातला फोटो आहे हे कोणीही सांगेल. मंगळसूत्र घालतोय मी तिच्या गळ्यात. सांगलीत झालेलं लग्न”. त्यांनतर पल्लवी म्हणाल्या, “अतिशय नाट्यमय रीतीने झालेलं लग्न”. त्यावर संकर्षण “नाट्यमयरीतीने म्हणजे?” असं विचारतो. गिरीश ओक याबद्दल म्हणातात, “हो म्हणजे विरोधात जाऊन सगळं झालं. कारण- तिच्या आई-वडिलांना मान्य नव्हतं. आता गोष्टी सगळ्या बदलल्या. आता मी त्यांना आपलंसं करुन घेतलं”.





