Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam : मराठी माध्यम शाळेच्या अस्मितेला ठाम आवाज देणाऱ्या ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २७ कोटींहून अधिक कमाई करत अभिमानास्पद यश संपादन केले असून, या चित्रपटाने चित्रपटगृहात अभिमानाने ५० यशस्वी दिवस पूर्ण केले आहेत. विशेष म्हणजे, चित्रपटाच्या टीमने हा अर्धशतकाचा आनंद साजरा करतानाच शिवजयंतीही मोठ्या उत्साहात साजरी केली आणि त्यामुळे हा सोहळा अक्षरशः दुहेरी जल्लोषात रंगला. मुंबईतील एका चित्रपटगृहात हा सोहळा मोठ्या दणक्यात, जल्लोषात आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझीमच्या तालावर साकारलेल्या सादरीकरणाने वातावरण भारावून गेले होते. घोड्यावरून ‘बालशिवरायां’चे आगमन होताच उपस्थितांमध्ये उत्साहाची प्रचंड लाट उसळली.
तर शिवगर्जना ऐकताना प्रेक्षक स्तब्ध झाले, पुढच्याच क्षणी टाळ्यांचा कडकडाट झाला. घोषणांचा नाद, मराठी अस्मितेचा अभिमान आणि जल्लोषमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यावेळी चित्रपटाच्या टीमने छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देत हा विशेष सोहळा विद्यार्थी आणि प्रेक्षकांसोबत साजरा केला. विशेष म्हणजे चित्रपटाच्या टीमने प्रेक्षकांसोबत बसून चित्रपट पाहिला. पडद्यावर चालणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त टाळ्या, शिट्ट्या आणि भावनिक प्रतिक्रिया उमटत होत्या. अनेकांनी आपल्या शाळेच्या आठवणींना उजाळा दिला, तर नव्या पिढीतील विद्यार्थ्यांनीही चित्रपटाशी मनापासून नाते जोडले. प्रेक्षकांच्या थेट प्रतिक्रिया जाणून घेण्याचा तो क्षण टीमसाठी अत्यंत भावनिक, अभिमानास्पद आणि समाधानकारक ठरला.
आणखी वाचा – अपूर्वा नेमळेकर पाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीची लगीनघाई; मेहंदी सोहळ्याचे फोटो समोर
दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाले, “आजचा दिवस खूप खास आहे. एका बाजूला आपल्या चित्रपटाचे ५० दिवस पूर्ण झाले आणि त्याच वेळी आपण छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करत आहोत. हा योगायोगच म्हणावा लागेल. मराठी शाळांच्या अस्तित्वासाठी असलेला हा चित्रपट आणि शिवरायांचा प्रेरणादायी वारसा या दोन्हींचा संगम आज अनुभवायला मिळाला. प्रेक्षकांसोबत चित्रपट पाहाताना मिळालेलं समाधान वेगळंच आहे. ते शब्दांत मांडणं अशक्यच. विशेष उल्लेखनीय म्हणजे उद्यापासून या चित्रपटाचे शोजही वाढत आहेत. प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच हे शक्य आहे”.
आणखी वाचा – सलीम खान यांची प्रकृती आता कशी?,सलग चौथ्या दिवशीही ICU मध्ये घेत आहेत उपचार, डॉक्टर म्हणाले…
दरम्यान, आठव्या आठवड्यात पदार्पण करताना चित्रपटगृहांची संख्या शंभरच्या वर पोहोचली असून शोजची संख्याही वाढत चालली आहे. प्रेक्षकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे चित्रपटाची ही यशस्वी घोडदौड अधिकच वेग घेत आहे. या चित्रपटात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले असून, निर्मितीची धुरा क्षिती जोग यांनी सांभाळली आहे. तर सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ आहेत.




