Kolkata Doctor Case : १५ ऑगस्ट २०२४ म्हणजेच काल भारताने स्वातंत्र्याचे ७८वे वर्ष साजरे केले. पण भारताला स्वातंत्र्य मिळून इतके वर्ष होऊनही या भारतात समस्त स्त्री जातीला अजूनही पारतंत्र्यात असल्याची भावना आहे. याचे मुख्य कारण म्हणजे दिवसेंदिवस वाढत जाणारे महिला व मुलींवरील वाढते अत्याचार. भारताने काल स्वातंत्र्य दिन साजरा केला,मात्र इतक्या वर्षांनी आम्ही या भारतात स्वतंत्र नसल्याची भावना अनेक स्त्रियांनी व्यक्त केली आहे आणि एक भारतीय म्हणून ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. कोलकातामध्ये एका ट्रेनी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे देशात संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मराठीसह बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी या घटनेनंतर संताप वक्त केला आहे. आपला राग, आपला आक्रोश, आपली चीड हे कलाकार सोशल मीडिया पोस्टद्वारे व्यक्त करताना दिसत आहेत. (Kolkata Doctor Rape Case Artist’s Angry Posts)
सिद्धार्थ चांदेकर, हेमांगी कवी, सई ताम्हणकर, समीर विद्वांस, जिनिलीया देशमुख, नेहा शितोळे, अनघा अतुल, अमित रेखी, हेमंत ढोमे, मंजिरी ओक, रोहित परशुराम यांसारख्या अनेक मराठी कलाकारांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “सॉरी भारत ‘माते’! तुला तुझ्याच घरात स्वातंत्र्य नाही! हा स्वातंत्र्य दिन तुझ्यासाठी आनंदी नाही. क्षमा.” असं म्हणत सिद्धार्थने एक व्हिडीओ शेअर केला आणि व्हिडीओमधून “आपल्या घरातली मुलगी संध्याकाळी सातच्या आत घरात येते की नाही हे बघण्यापेक्षा आपल्या घरातला मुलगा संध्याकाळी सातनंतर कुठे जातो? काय करतो? काय संगत आहे त्याची? कोणाशी बोलतोय? काय विचार आहेत त्याचे? हे बघणं जास्त गरजेचं आहे” असं मत व्यक्त केलं.

हेमांगी कवीने “आता तर ती रोजच्याच कामाच्या ठिकाणी होती. कुठल्याही पब, नाईट्स शोमध्ये नव्हती. कोणत्याही मित्र, यार, प्रियकराबरोबर नव्हती. ट्रेनी डॉक्टर असल्यामुळे मेकअपही केला नसावा किंवा तोकडे कपडेही नसावेत. तरीही ती सुरक्षित नव्हती” असं म्हणत या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. तर ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम रोहित परशुरामनेही त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत “एका मुलीचा बाप म्हणून या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा द्याव्याशा नाही वाटल्या. फक्त पुरुष स्वतंत्र असलेल्या देशात राहतोय आपण. ज्या दिवशी स्त्रिया स्वतंत्र होतील. त्यादिवशी एकमेकांना शुभेच्छा देऊ” असं म्हटलं आहे. सई ताम्हणकरनेही याबद्दल संतापजनक पोस्ट शेअर करत “या स्वातंत्र्यदिनी एक नवीन नियम करा ना, बलात्काराची शिक्षा फाशी! महिलांना महिला होण्यापासून स्वातंत्र्य द्या” असं म्हटलं.
यासह जिनिलीया देशमुखनेही “या नराधमांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. ज्यादिवशी या देशातील महिला सुरक्षिततेची भावना व्यक्त करतील. तेव्हाच हा देश माझ्यासाठी स्वतंत्र होईल” असं मत व्यक्त केलं आहे. याबरोबरचं प्रीती झिंटा, समंथा रुथ प्रभू, क्रिती सेनॉन, आलिया भट्ट, हृतिक रोशन, ट्विंकल खन्ना यांसारख्या अनेक कलाकारांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये ९ ऑगस्ट रोजी एका डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून न्यायाची मागणी होत आहे. कोलकात्यातही निदर्शने होत आहेत. या घटनेबाबत आवाज उठवला आहे.