National Film Awards 2024 : प्रतिष्ठित व मानाचे समजल्या जाणाऱ्या ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली. आज जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये अनेक चित्रपट व कलाकारांनी आपली छाप सोडली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून या कलाकृतींचा व कलाकारांचा गौरव केला जाणार आहे. या पुरस्कारामध्ये मराठी कलाकृतींनी विजेत्यांच्या यादीत आपले स्थान पटकावले आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार ‘वाळवी’ला देण्यात आला. ‘वाळवी’ हा चित्रपट २०२३ साली पडद्यावर आला. परेश मोकाशी यांना हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. तर झी स्टुडिओजनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. डार्क कॉमेडी प्रकारातला हा रहस्यपट असून या चित्रपटात स्वप्नील जोशी, अनिता दाते केळकर, सुबोध भावे आणि शिवानी सुर्वे यांनी भूमिका साकारल्या आहेत. (70th National Awards Announcement)
मराठीचा आणखी एक सन्मान या पुरस्कारांच्या निमित्तानं झाला आहे. तो म्हणजे साहिल वैद्य यांच्या ‘मर्मर्स ऑफ जंगल’ या माहितीपटाला उत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार मिळाला आहे. याच माहितीपटाला उत्कृष्ट निवेदनाचाही पुरस्कार मिळाला आहे. याचबरोबर सचिन सूर्यवंशी यांच्या ‘वारसा’ या माहितीपटालाही पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय बॉलिवूड चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’लादेखील पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाच्या संगीतासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार संगीतकार प्रीतमला मिळाला आहे. तसंच ‘पोन्नियिन सेलवन १’ चित्रपटाला तामिळमधील बेस्ट चित्रपट म्हणून पुरस्कार मिळाला आहे.
‘कार्तिकेय २’ चित्रपटाला तेलगूमधील बेस्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय ‘के.जी.एफ. चाप्टर २’ला सर्वोत्कृष्ट कृती दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. अभिनेता ऋषभ शेट्टीला त्याच्या ‘कांतारा’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळाल्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. तसंच मनोज बाजपेयी यांना ‘गुलमोहर’साठी स्पेशल मेन्शन पुरस्कार मिळाला आहे. सूरज बडजात्या यांना ‘उंचाई’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. नीना गुप्ता यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. पवन मल्होत्राला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील विजेत्यांची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे:
सर्वोत्कृष्ट अभिनेता – ऋषभ शेट्टी (कातारा)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – नित्या मेनन व मानसी पारेख तिरुचित्राबलम (तमिळ)
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट – कांतारा
सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपट – अट्ट्म
सर्वोत्कृष्ट तेलगू चित्रपट – कार्तिकेय २
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – वाळवी
सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट – केजीएफ चाप्टर २
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – गुलमोहर
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक – प्रीतम (ब्रम्हास्त्र) व ए.आर. रहमान (पी.एस.1)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – अरिजीत सिंह (ब्रम्हास्त्र- केसरिया)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – नीना गुप्ता
विशेष उल्लेखनीय पुरस्कार – मनोज वाजपेयी (गुलमोहर)