Ankita Walawalkar Kelvan : ‘बिग बॉस मराठी’ हे यंदाचं पर्व विशेष गाजताना दिसलं. यंदाच्या या पर्वात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सने हवा केलेली पाहायला मिळाली. यंदाच्या या पर्वात विशेष चर्चा रंगली ती म्हणजे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरची. अंकिताने ‘बिग बॉस’च्या घरात येत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ‘बिग बॉस’मुळे अंकिताला विशेष लोकप्रियता मिळाली. ‘बिग बॉस’ संपल्यानंतरही अंकिता कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेली पाहायला मिळाली. अंकिताचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर ती नेहमीच कोकणी, मालवणी भाषेतील कंटेंट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
‘बिग बॉस’नंतर अंकिताने एक मोठी घोषणा केली. ज्याने साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच अंकिता लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचं समोर आलं. ‘बिग बॉस’च्या घरातही अंकिताला लग्नाविषयी विचारलं जात होतं मात्र तिने याबाबत बोलणं टाळलं. त्यानंतर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कोकण हार्टेड गर्ल नवऱ्याचा चेहरा रिव्हिल करत ती लोकप्रिय मराठी संगीत दिग्दर्शक कुणाल भगतसह लग्न बंधनात अडकणार असल्याचं तिनं जाहीर केलं.
आणखी वाचा – “तुम्ही पारूला सून म्हणून कधी स्वीकारणार?”, प्रश्न विचारताच अहिल्यादेवींचं धक्कादायक उत्तर, म्हणाल्या…

अंकिता आता केव्हा लग्नबंधनात अडकणार याकडे साऱ्यांच्याच नजरा लागून राहिल्या आहेत. अशातच अंकिताची लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळतेय. शॉपिंग दरम्यानचे अनेक व्हिडीओ, फोटो ती पोस्ट करताना दिसत आहे. अशातच अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केलेल्या एका फोटोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. या फोटोमध्ये अंकिता व कुणाल यांचं पहिलं केळवण असल्याचं दिसून येतंय. अंकिता व कुणाल यांच्या नातेवाईकांनी दोघांसाठी खास केळवणाचा बेत केला असल्याचं पाहायला मिळत आहे.
फुलांची सजावट करुन मधोमध केळीच्या पानावर केळवण लिहिलेलं दिसतंय. दोघांचा यावेळी पारंपरिक अंदाज सार्यांच्याच पसंतीस पडला. केळवणात यावेळी शाकाहारी बेत असल्याचं दिसतंय. अंकिता व कुणाल यांनी अद्याप लग्नाची तारीख जाहीर केली नसली तरी ही जोडी नेमकी केव्हा विवाहबंधनात अडकणार याकडे तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.