मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत एका अभिनेत्रीचं नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे अभिनेत्री मृणाल दुसानिस. मृणालच्या अभिनयाने ती प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आहे. इतकंच नव्हेतर तिचा लाघवी, सुशील, सोज्वळ स्वभाव प्रेक्षकांना अधिक भावतो. छोट्या पडद्यावरील ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेमुळे मृणालला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. करिअरच्या टर्निंग पॉइंटवरचं अभिनेत्रीने लग्न करत आयुष्याला कलाटणी देणारा निर्णय घेतला. (Mrunal Dusamis Husband Profile)
मृणालने २०१६ साली नीरज मोरेसह लग्नगाठ बांधली. मृणाल ही मूळची नाशिकची आहे तर नीरज हा पुण्याचा आहे. दोघांनी अत्यंत साधेपणाने आणि कुटुंबीय, नातेवाईक, कलाकार मंडळींच्या उपस्थितीत ते विवाहबंधनात अडकले. नीरज हा कामानिमित्त भारताबाहेर अमेरिकेत असायचा. त्यामुळे लग्नानंतरही मृणालने अमेरिकेत जायचा निर्णय घेतला. करिअरच्या शिखरावर असताना मृणालने हा निर्णय घेतला. अमेरिकास्थित नीरज मोरे याच्याशी मृणालचा विवाह झाल्यानंतर ती देखील लॉस एंजिलिस येथे शिफ्ट झाली.
मृणालचा नवरा अमेरिकेत नेमक्या कोणत्या क्षेत्रात कामाला आहे याबाबत तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. अभिनेत्रीने नुकतीच सुलेखा तळवलकरच्या ‘दिल के करीब’ या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी बोलताना ती म्हणाली, “नीरज आयटी क्षेत्रात कार्यरत आहे. अमेरिकेत त्याने त्याचं मास्टर पूर्ण केलं आणि तो गेली १३-१४ वर्ष तिथेच काम करत होता. आणि आता अचानक आम्ही दोघांनी भारतात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही इथे आलो. आता त्याने कंपनी स्विच केली असून तो सध्या भारतातून काम करत आहे”.
‘तू तिथे मी’, ‘असं सासर सुरेख बाई’, ‘माझिया प्रियाला प्रित कळेना’, ‘हे मन बावरे’ या मालिकांमधून मृणालने महत्त्वपूर्ण कामगिरी करत लोकप्रियता मिळवली. गेल्या चार वर्षांपासून मृणाल मालिकाविश्वात कार्यरत नसून तिचे चाहते तिला मिस करताना दिसत आहेत. मृणाल पुन्हा मालिकेत केव्हा दिसणार याकडे सारे प्रेक्षक डोळे लावून बसलेले असतानाच मृणाल आता कायमची भारतात परतली आहे. आणि लवकरच ती मालिकाविश्वात पदार्पण करणार असल्याचंही समोर आलं आहे.