‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत सरगमची एंट्री झाल्यापासून मालिकेला एक वेगळंच वळण आलेलं पाहायला मिळत आहे. अक्षरा-अधिपती यांच्यातील प्रेमाचं नातं बहरत असतानाच सरगमच्या एन्ट्रीने त्यांच्या नात्याला नजर लागली आहे. अधिपतीला गाणं शिकायचं असतं त्यामुळे भुवनेश्वरी सरगमची निवड करतात. आणि अधिपतींच्या आयुष्यातून अक्षराला घालवण्यासाठी सरगमचा वापर करतात. (Tula Shikvin Changalach Dhada Promo)
भुवनेश्वरी सरगमला काही पैसे देऊन अधिपतींच्या जवळ जाण्यास सांगते. मात्र सरगम आल्यादिवसापासून तिची लक्षणे काही ठीक दिसत नाहीत हे अक्षरा ओळखून असते. अक्षरा सरगमवर नजर ठेवूनच असते. शिकवणीदरम्यान अधिपतींबरोबर गप्पा मारल्याने अक्षरा एक-दोनदा सरगमला टोकते. मात्र सरगमही माझी शिकवण्याची पद्धत वेगळी असल्याचं सांगते. आणि भुवनेश्वरी ही सरगमला पाठिंबा देत अक्षराला त्यांच्या शिकवणीत ढवळाढवळ न करण्याचा सल्ला देते.
अशातच मालिकेच्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सरगम व भुवनेश्वरी यांची वागणूक पाहून अक्षरा दुखावली जाणार असल्याचं दिसत आहे. प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत की, घरात कार्यक्रमानिमित्त काही महिला येतात. तेव्हा भुवनेश्वरी व सरगम तिथे असतात. तेव्हा एक महिला भुवनेश्वरीला विचारते, “यांची ओळख काय?”, यावर भुवनेश्वरी म्हणते, “या आमच्या नव्या पाहुण्या आहेत. सरगम”. तेव्हा सरगमही सर्वांना हात जोडून नमस्कार करते.
यावर त्या महिला म्हणतात, “सुनबाई आहेत वाटतं. चला ओटी भरुन घेऊ”, असं म्हणत त्या सरगम जवळ ओटी भरायला येतात. सरगमची ओटी भरणार इतक्यात अक्षरा थांबा असं म्हणत त्यांना थांबायला सांगते. आणि त्यांना विचारते, “तुम्ही यांची ओटी का भरताय. मी सून आहे या घरची. अक्षरा अधिपती सूर्यवंशी”. असं म्हणत अक्षरा भुवनेश्वरीकडे पाहू लागते. हा सगळा प्रकार घडताना भुवनेश्वरीने त्या महिलांना का थांबवलं नाही, भुवनेश्वरीची ही नवी चाल असेल का?, हे अक्षराला कळेल का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.