Maitricha Saatbara Interview : ‘आठवी अ’, ‘पाऊस’, ‘दहावी अ’ वेबसीरिजच्या भरघोस यशानंतर आणखी एका वेबसीरिजची जोरदार चर्चा सुरु झाली. ती वेबसीरिज म्हणजे ‘मैत्रीचा ७/१२’. या वेबसीरिजचं पोस्टर, ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये याबाबत उस्तुकता होती. अखेरीस ‘मैत्रीचा ७/१२’ प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सोशल मीडियाद्वारे तर ‘मैत्रीचा ७/१२’ला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. याचनिमित्त या सीरिजच्या कलाकारांशी आपण गप्पा मारणार आहोत. या सीरिजमध्ये छाया हे पात्र साकारणारी आर्या हिच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरु करुया आजच्या गप्पा…
अभिनयक्षेत्रातील तुझा प्रवास कसा सुरु झाला? आणि ‘मैत्रीचा सातबारा’साठी तुझी निवड कशी झाली?
लहानपणापासूनच मला कलेची आवड होती. भरतनाट्यम मी शिकले आहे. त्यामुळे या क्षेत्राशी माझं जवळचं नातं आहे. मैत्रीचा सातबाराच्या ऑडिशनला मला येता येणार नव्हतं पण आमचे डीओपी यांनी ऑडिशन देऊन बघ असं सांगितलं. त्यामुळे मी एक कार्यक्रम अर्ध्यावर सोडून या ऑडिशनला आले. जर इथेही मी सिलेक्ट झाले नसते तर इव्हेंट सोडून आल्याचा आणि सिलेक्ट न झाल्याची खंत कायम मनात राहिली असती. पण तसे झाले नाही. या वेबसीरिजसाठी माझी निवड झाली.
या क्षेत्रातील तुझं पहिलं काम कोणतं आहे?
माझ्या कुटुंबातील कोणीही या क्षेत्रात कार्यरत नाही. मीच पहिली असावी जी या क्षेत्रात काम करते. काम करायला माझी सुरुवात ही नाटकांपासून झाली. भरतनाट्यमला सुरुवात केली. त्यामुळे त्यात मला अभिनय शिकायला मिळाला. आणि याच अंतर्गत मी नाटकांपर्यंत पोहोचले आणि मी पहिलं नाटक केलं.
आणखी वाचा – Oscar 2025 : भारतात कधी आणि कुठे लाइव्ह पाहता येणार ऑस्कर पुरस्कार सोहळा, तारीख, वेळ जाणून घ्या…
‘मैत्रीचा सातबारा’तील छाया या पात्रासाठी तू कशाप्रकारे मेहनत घेतली?
हे पात्र माझ्या स्वभावाच्या खूप विरुद्ध आहे. खूप शांत, मितभाषी पात्र आहे. त्यामुळे सुरुवातीला महिनाभर मी जास्त काही बोललेच नाही. सेटवर मी चुकून बोलायला सुरुवात केली तर माझ्या चेहऱ्यावर छायासाठीचे भाव उमटणार नाहीत ना असं मला वाटलं. आणि हे मला अपेक्षित नव्हतं. त्यामुळे मी शांत राहण्याला प्राधान्य दिलं. या पात्रासाठी मला वेगळी अशी काही मेहनत घ्यावी लागली नाही फक्त मला शांत राहायला भाग पाडलं. हे शांत राहणं मला खूप कठीण वाटलं. त्या पात्राला न्याय देण्यासही हे करणं अर्थात मला भाग होतं. हे पात्र साकारण्यासाठी सहकलाकारांचीही साथ लाभली.
‘मैत्रीचा सातबारा’मधील छाया या पात्रातून तू कोणत्या गोष्टी शिकलीस?
या प्रोसेसमध्ये मी बरंच काही शिकले आहे. हातातलं आपलं काम ठेवून दुसऱ्यांच्या हाकेला धावून जाणं ही छायामधील एक गोष्ट आर्या म्हणून मला आवडली.
तुझी ही भूमिका पाहिल्यानंतर कुटुंबाकडून, सोशल मीडियाद्वारे कसा प्रतिसाद मिळाला?
पहिल्यांदा अधिक काळ सुरु असणाऱ्या या वेबसीरिजमध्ये काम मिळालं हे जेव्हा घरी सांगितलं तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न हाच होता की, तू तुझ्या कॉलेजच काय करणार आहेस?. मात्र त्यांचा माझ्यावर विश्वास होता आणि मीदेखील शूटिंग आणि कॉलेज दोन्ही मॅनेज केलं. जे लोक मला ओळखतात त्यांच्यासाठी हे पात्र मी साकारणं धक्कादायक होतं. आईला वगैरे ही वेबसीरिज खूप आवडली.
आणखी वाचा – “तरुण मुलगी आहे, शॉर्ट्समध्ये वावरते…”, गोविंदापासून दूर राहण्याचा पत्नीने केला खुलासा, म्हणाली, “या जगात…”
‘मैत्रीचा सातबारा’ वेबसीरिजमधील आठवणीतला क्षण कोणता?, एखादा सेटवरचा किस्सा…
शूटिंगदरम्यानचा प्रत्येक दिवस लक्षात ठेवण्यासारखा आहे. आम्ही सीन शूट करताना खूप धमाल केली आहे त्यामुळे आठवणी खूप आहेत. एक अशी आठवण सांगणं फार कठीण आहे. वेबसीरिजच्या दिग्दर्शकांनी सेटवर छान वातावरण निर्माण केलं होतं. त्यामुळे एखादा सीन करताना आम्हाला त्या सीनदरम्यानच्या भूमिकेसाठी काय योग्य आहे हे आमच्या मताने करण्याची संमती होती. कित्येक सीन असेच शूट झाले आहेत.