सिनेसृष्टीत सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. प्रेक्षकांचा लाडका दगडू म्हणजेच प्रथमेश परब त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसह लग्नबंधनात अडकला. तर त्यापाठोपाठ मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तितीक्षा तावडे ही देखील अभिनेता सिद्धार्थ बोडकेसह नुकतीच लग्नबंधनात अडकली. प्रथमेश, तितीक्षा यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगलेल्या पाहायला मिळाल्या. प्रथमेश, तितीक्षा मागोमाग आणखी एक लोकप्रिय अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे. ही प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. (Pooja Sawant Siddhesh Chavan)
पूजाच्याही लग्नापूर्वीच्या विधींचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहे. पूजा सिद्धेश चव्हाणसह लग्नबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वी पूजाने तिचा बॉयफ्रेंड सिद्धेशबरोबरचे पाठमोरे फोटो शेअर करत साऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर थेट तिने तिच्या बॉयफ्रेंडचा चेहरा दाखवत लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं. तेव्हापासून पूजा केव्हा लग्न करणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या.
आणखी वाचा – Video : हळद लागताच रडू लागली पूजा सावंत, मंडपातील ‘तो’ भावुक व्हिडीओ व्हायरल
अशातच आता पूजाला सिद्धेशच्या नावाची हळद लागलेली पाहायला मिळत आहे. नुकताच पूजाचा थाटामाटात हळदी कार्यक्रम पार पडला. जवळचे कुटुंबीय, नातेवाईक व मित्र-परिवाराच्या उपस्थितीत हा हळदी समारंभ अगदी धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. पूजाला हळद लावताना ती थोडीशी भावुक झालेली ही पाहायला मिळाली. यावेळी अभिनेत्रीचा हळदी स्पेशल लूक सर्वांच्याच पसंतीस पडला.
पूजाने व सिद्धेशने सारख्याच रंगाचे म्हणजेच जांभळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. तर इतर मंडळींनी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. जांभळ्या रंगाच्या या हटके लूकमध्ये दोघेही खूपच सुंदर दिसत होते. तर पूजाच्या हातातील हिरवा चुडा आणि केसात माळलेल्या पांढऱ्या रंगाच्या गजऱ्याने तिचं सौंदर्य आणखीनच फुलून आलं होतं. पूजाने लेहेंगा-चोळी परिधान केली होती तर सिद्धेश जांभळ्या रंगाच्या कुर्ता पायजमामध्ये पाहायला मिळाला. हळदी समारंभात तुफान डान्स करत सगळ्यांनी खूप मजा केली. यावेळी अभिनेत्रीने खास ‘बुमरो बुमरो’ या गाण्यावर ठेका धरलेला पाहायला मिळाला.