Digamber Naik Statement : स्ट्रगल हा कोणालाच चुकलेला नाही. सर्वसामान्यांप्रमाणे असे अनेक कलाकार मंडळी ज्यांनाही स्ट्रगलचा सामना करावा लागला आहे. बरेचदा मुलाखतींमध्ये ही कलाकार मंडळी त्यांच्या स्ट्रगलबाबत खुलेपणाने भाष्य करतात. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्याने इंडस्ट्रीत काम मिळण्याबाबत, इंडस्ट्रीतील काही लोकांनी काम देण्याचे आश्वासन देण्याबाबत स्पष्टपणे भाष्य केलं आहे. अशी बरीच कलाकार मंडळी आहेत ज्यांनी आजवर इंडस्ट्रीत काम न मिळण्याबाबत वाचा फोडली आहे. वा इंडस्ट्रीतील कंपूशाहीबाबत स्पष्टपणे बोललं आहे. अशातच आता अभिनेता दिगंबर नाईकनेही इंडस्ट्रीत काम न मिळण्यावरुन भाष्य केलं आहे.
इट्स मज्जाच्या Behind the fame या पॉडकास्टमध्ये दिगंबर नाईक यांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना त्यांनी इंडस्ट्रीचा एक चेहरा सर्वांसमोर आणला. ते म्हणाले, “प्रत्येक मिठी मारणारा माणूस काम देतो असं नसतंच ना. म्हणजे मी ‘वस्त्रहरण’ नाटक जेव्हा फर्स्ट टाइम (First time) केलं, तेव्हा एक फार मोठे दिग्दर्शक प्रबोधनकार ठाकरेला आले. आणि मला म्हणाले, ‘काय पाहिजे ते माग’. म्हटलं, ‘एखादं नाटक सर’. ‘डन’. आजपर्यंत त्यांच्याबरोबर मी काम नाही केलंय. त्यांनी मला कुठच्याही प्रोजेक्टमध्ये घेतलं नाही, ज्यांचं नाव चंद्रकांत कुलकर्णी. नाही, मला काही फरक नाही पडत. मी कधीच नाही, मी त्यांच्या कुठच्याच प्रोजेक्टमध्ये नाही—सिरीयलमध्ये नाही, नाटकात नाही”.
पुढे त्यांनी म्हटलं, “कदाचित त्यांना असं वाटत असेल की ते ज्या स्टाईलची नाटकं करतात, ती करण्याची माझी पात्रता नाही किंवा ती भाषा मी वापरु शकत नाही, किंवा काही असेल, किंवा त्यांच्या हिशोबात मी बसत नाही. केदार शिंदे… कधीही दिसला मिठी मारणार, पण आजपर्यंत मी त्याच्याकडे कधीच काम केलं नाही. ‘घडलंय-बिघडलंय’ नंतर कधीच नाही. एका नाटकात मी काम करणार होतो, ‘सही रे सही’, जेव्हा तोही तेवढा फेमस नव्हता आणि मीही नव्हतो. पण काही योगायोगाने मला करता नाही आलं”.





