Bigg Boss Marathi 6 Sagar Karande : ‘बिग बॉस मराठी’ सिझन ६ चे पर्व चांगलंच गाजताना दिसत आहे. या पर्वातील प्रत्येक स्पर्धकाने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं. यंदाच्या पर्वाचे जवळपास ८५ दिवस पूर्ण झाले आहेत. या पर्वात अभिनेता सागर कारंडेने चांगलीच छाप पाडली. सागरने उत्तम खेळ खेळत रसिकांची मन जिंकली. मात्र फिनाले पर्यंत जाण्याआधीच सागरचा ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील प्रवास संपला. सागरला ‘बिग बॉस’च्या घरात असताना खूप पाठिंबा मिळाला. घराबाहेर आल्यानंतर आता सागर त्याच्या कुटुंबियांसह वेळ घालवताना दिसत आहे. याचा व्हिडीओ त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. सागरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याचे कलाविश्वातील मित्र, जवळचे नातेवाईक आणि परिवार सेलिब्रेशन करताना दिसत आहे.
यावेळी भावुक होत सागर असं म्हणताना दिसत आहे की, “‘बिग बॉस मराठी ६’चा प्रवास खरंच खूपच खडतर होता. पण तो उत्तम झाला कारण तुम्ही सगळे होता म्हणून…मी घरात असताना बाहेर तुम्ही सगळे माझ्या पाठीशी उभे आहात हे जाणीव मला सतत त्या घरात होत होती. आता तुम्ही सगळे माझं अभिनंदन करायला आला आहात त्यासाठी धन्यवाद. आणि असंच माझ्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये माझ्या पाठीशी राहा. सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार ज्यांनी मला वोट केलं. गेले ८५ दिवस मी घरात राहावं आणि माझा प्रवास छान व्हावा म्हणून तुम्ही मला वोट केलं आणि मी ८५ दिवस त्या घरात राहू शकलो. १०० दिवस राहायचं होतं पण हरकत नाही पण माझा प्रवास उत्तम झाला. मी खुश आहे. नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून मी तुमचं मनोरंजन करायला येतच राहीन”.
हा व्हिडीओ शेअर करत त्याने पोस्ट करत म्हटलंय, “आयुष्याच्या प्रत्येक Milestone वर कौतुकाची थाप देण्यासाठी कुणीतरी हवं असतं ना?, तर ८५ दिवसांनी माझ्या जगात परतलोय, आपल्या माणसांनी भरलेलं घर, आपल्यासाठीच्या कौतुकाने भरलेलेले त्यांचे डोळे आणि त्यांनी मिळून आपल्यासाठी प्लॅन केलेलं सुंदर सरप्राइज. हिच तर फॅमिलीची गंमत आहे. सध्या भारावून गेलोय. या सगळ्या अमूल्य क्षणांची शिदोरी घेऊन पुन्हा नव्या जोमाने कामाला लागायचंय. माझ्या मनात रसिक प्रेक्षकांविषयी असलेली कृतज्ञता कायम आहेच. शुभाशीर्वाद असूद्या”.





