छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाल्या आहेत.मालिकेच्या माध्यमातून ही कलाकार मंडळी घराघरात पोहोचतात. या कलाकारांना मालिकेमुळे मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळते. सध्या अनेक मालिका वेगवेगळे विषय घेऊन येत आहेत. अनेक नवनवीन चेहरे मालिकांच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पाहायला मिळत आहेत. मालिकांची तगडी स्पर्धा सुरु असलेली पाहायला मिळतेय. या मालिकांच्या स्पर्धेत काही मालिका अजूनही प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरताना दिसत आहेत. (Marathi Serial Shoot)
या मालिका पडद्यामागे बरीच मेहनत घेताना दिसतात. पडद्यामागे सीन शूट करताना हे कलाकार दिवस-रात्र, ऊन, वारा, पाऊस यांची कसलीही पर्वा न करता केवळ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी जीव तोडून मेहनत घेताना दिसतात. अशातच एका मालिकेच्या लक्षवेधी सीनच्या शुटींगच्या व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘काव्यांजली’ या मालिकेतील अपघाताच्या सीनच्या शूटिंगचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. यांत अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी पाहायला मिळतेय.
हा व्हिडीओ अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री रस्त्यावरून चालत असताना मागून येणारा टेम्पो तिला धडक देतो आणि ती जखमी होते, असं सीनमध्ये दाखवण्यात आलं आहे. जेव्हा मागून टेम्पो येतो तेव्हा कश्मिराला क्रेनच्या सहाय्याने वर उचललं जातं आणि टेम्पोवर ठेवलं जातं. मात्र, टेम्पोवर येत असताना तिच्या पायाला जोरात लागलेलं व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय. असा हा अपघाताचा कठीण सीन शूट करतानाचा व्हिडीओ अभिनेत्रीने शेअर केला आहे.
हा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री म्हणाली आहे की, “कितीही अडचणी आल्या तरी परफेक्ट सीन पूर्ण होईपर्यंत मायबाप प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पडद्यामागे प्रत्येक जण मेहनत करत असतो”. व्हिडीओमध्ये पाहिल्याप्रमाणे कश्मिराने या अपघाताच्या सीनसाठी विशेष मेहनत घेतलेली पाहायला मिळतेय. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंट करत कश्मिरा म्हणजेच मालिकेतील काव्याची विचारपूस केली आहे. ‘खूप लागलं असेल’, ‘काळजी घ्या’ अशा कमेंट करत चाहत्यांनी कश्मिरावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.