छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम म्हणजे ‘खुपते तिथे गुप्ते’. या कार्यक्रमाची धुरा सुप्रसिद्ध गायक अवधुत गुप्ते सांभाळतो. अवधुतच्या सुत्रसंचालनाची स्टाइल सगळ्यांनाच आवडते. आजवर या कार्यक्रमात कलाक्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली. इतकंच नव्हे तर काही राजकीय क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींनीही या कार्यक्रमामध्ये हजेरी लावत दिलखुलास गप्पा मारल्या. आता मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशी ‘खुपते तिथे गुप्ते’च्या येत्या भागामध्ये हजेरी लावणार आहे.
‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये कलाकार मंडळी त्यांच्या कामाबाबत तसेच खासगी आयुष्याबाबत भाष्य करताना दिसतात. अवधुतही या कार्यक्रमात येणाऱ्या व्यक्तींना बेधडक प्रश्न विचारतो. आता जितेंद्रला तो विविध प्रश्न विचारताना दिसणार आहे. झी मराठी वाहिनीने ‘खुपते तिथे गुप्ते’चा नवा प्रोमो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे प्रदर्शित केला आहे. या प्रोमोमध्ये अवधुत व जितेंद्रमध्ये भांडण झाल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
आणखी वाचा – “ती कधीच आई होऊ शकत नाही”, आदिल खानच्या आरोपांवर भडकली राखी सावंत, म्हणाली, “माझं गर्भाशय…”
अवधुत जितेंद्रला विचारतो, “आवडता दिग्दर्शक नागराज मंजुळे की निखिल महाजन?”. यावर जितेंद्र उत्तर न देता अवधुतला उलट प्रश्न विचारतो. “तुझा आवडता अभिनेता कोण? जितेंद्र जोशी की संतोष जुवेकर?”. या प्रश्नानंतर अवधुतच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलताना दिसतात. अवधुत व जितेंद्र भडकलेले दिसतात.
अवधुत म्हणतो, “हा शो माझा आहे प्रश्न मी विचारणार”. त्यानंतर जितेंद्र रागामध्ये खुर्चीमधून उठतो आणि म्हणतो, “आम्ही इथे बसलेलो असतो आम्हाला काय ऊत आला आहे का?”. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तसेच आता या दोघांमध्ये खरंच भांडण झालं आहे का? हे संपूर्ण भाग प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.