सिनेसृष्टीत सध्या ‘झिम्मा २’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटातील ‘मराठी पोरी दुनियेला दाखवती माज’ या गाण्याने तर सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अनेक रसिक प्रेक्षक या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. अशातच या चित्रपटातील मुख्य अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि त्याच्या पत्नीला म्हणजेच मिताली मयेकरला ही या गणयावर थिरकण्याचा मोह आवरला नाही. सिद्धार्थने काल इंस्टाग्राम अकाऊंटवरून स्टोरी पोस्ट करत या गाण्यावर धमाल करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. (Siddharth Chandekar Troll)
“मराठी पोरी…” हे ‘झिम्मा २’ चित्रपटातील पहिलं गाणं असून या गाण्याने अल्पावधीतच प्रेक्षकांना थिरकायला भाग पाडलं. या गाण्यामध्ये चित्रपटातील इंदू डार्लिंगच्या ७५ व्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन पाहायला मिळालं. या गाण्यातून स्त्रीत्वाचे अनेक पदर उलगडताना दिसले. स्त्रियांवर चित्रित करण्यात आलेलं हे गाणं प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतंय. या गाण्यावर नेटकरी, तसेच सिनेविश्वातील अनेक कलाकार रिल्स बनवत आहेत.
सिद्धार्थ-मितालीने या गाण्यावर केलेला डान्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. कमी वेळात हे गाणं भरपूर्ण लोकांनी पाहिलं आणि त्यांच्या व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव झाला. तसेच त्यांचा हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊसही पाडला. या जोडप्याने राहत्या घरी हा डान्स व्हिडीओ शूट केल्यामुळे सिद्धार्थ-मितालीच्या घराची झलक या व्हिडीओमध्ये नेटकऱ्यांना पाहायला मिळाली. दरम्यान दिवाळीनिमत्त सिद्धार्थ मितालीने घरामध्ये लायटिंग केली होती. विद्युत रोषणाईत त्यांचं घर उजळून निघालं होतं. त्यांचा हा व्हिडीओ पाहून एका युजरने कौतुक न करता त्यांच्या घरातील ‘पंखा स्वच्छ नाहीये’, अशी कमेंट करत त्यांना टोकलं.

“पंखा साफ करायची वेळ आलीये” अशी कमेंट करत या नेटकऱ्याने सिद्धार्थ-मितालीची खिल्ली उडवली. परंतु, अभिनेत्याने या कमेंटकडे दुर्लक्ष न करता “कधी येताय?” असा खोचक प्रश्न विचारत नेटकऱ्याच्या प्रश्नाला रोखठोक प्रतिउत्तर दिलं. सिद्धार्थच्या कमेंटवर त्याच्या चाहत्यांनी “भारी उत्तर दिलंस” अशी प्रतिक्रिया दिली. तर नेटकऱ्याने सिद्धार्थच्या उत्तरावर पुन्हा कमेंट करत, “सिद्धू, हा विनोदी भाग होता. मला पंखे साफ करता आले असते तर माझ्या घरचे पंखेही असेच दिसले नसते. ”झिम्मा २’ चित्रपटाची वाट बघतोय”. अशी कमेंट केली आहे. यावरून सिद्धार्थच्या एका चाहत्यानेच ही मस्करी केलेली कळतेय.