ज्येष्ठ महिन्यात येणारी पहिली पौर्णिमा ही ‘वटपौर्णिमा’ म्हणून साजरी केली जाते. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत ठेवून वडाच्या झाडाची पूजा करतात. धार्मिक मान्यतेनुसार, वटपौर्णिमेच्या दिवशी वट म्हणजेच वटवृक्षाची पूजा केली जाते. तसेच माता सावित्रीच्या कथेचा पाठ केला जातो. मान्यतेनुसार, या व्रताच्या प्रभावाने पतीवर येणारे प्रत्येक संकट टळते आणि त्याला दिर्घायुष्य लाभते. तसेच वैवाहिक जीवनही सुखी आणि समृद्ध होते.
यंदा मराठी सिनेसृष्टी व टेलिव्हिजनवरील अनेक जण विवाहबंधनात अडकले. त्यामुळे यावर्षी बऱ्या अभिनेत्रींसाठी वटपौर्णिमेचा सण खास आहे. अनेक मराठी कलाकार आज पहिल्यांदाच त्यांची वटपौर्णिमा साजरी करणार आहेत. यंदा मुग्धा-प्रथमेश, गौतमी-स्वानंद, शिवानी-अजिंक्य, तितीक्षा-सिद्धार्थ आदी कलाकारांसह टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेता सौरभ चौघुले व अभिनेत्री योगिता चव्हाण ही जोडीही विवाहबंधनात अकडली. त्यामुळे सौरभ व योगिता यांच्यासाठीही यंदाचा वटपौर्णिमेचा सण विशेष आहे. आजच्या वटपौर्णिमेच्या खास सणानिमित्त सौरभ-योगिता यांनी त्यांचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

योगिता-सौरभ यांनी त्यांच्या परिसरातील एके ठिकाणी वटपौर्णिमा साजरी केली आहे. सौरभने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे बायकोचा वडाला फेऱ्या मारतानाचा फोटो शेअर केला आहे आणि या फोटोमध्ये त्याने बायकोला “प्रेम” असं म्हटलं आहे. तर त्याने दोघांचा क्युट फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये योगिताने जांभळ्या रंगाची गुलाबी काठ असलेली साडी परिधान केली असून सौरभने पांढऱ्या रंगाचा नक्षीकाम असलेला कुर्ता व त्यावर पायजमा घातला आहे. या फोटोमध्ये दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडल्याचे दिसत आहेत.
सौरभने आजच्या या खास दिवसासाठी बायकोला गुलाबाचे फूलही भेट म्हणून दिले आहे. याचा फोटोही योगिताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केला आहे. “सौरभची प्रेम व्यक्त करण्याची भाषा” असं म्हणत तिने हा फोटो शेअर केला आहे. दरम्यान, ३ मार्चला सौरभ व योगिता यांचा लग्नसोहळा अगदी थाटामाटात पार पडला. दोघे त्यांच्या काही खास क्षणांचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशातच सौरभ-योगिता या दोघांनी त्यांच्या पहिल्या वटपौर्णिमेचे काही खास क्षण शेअर केले आहेत.