तब्बल तीन वर्षांनंतर भारतातील सिनेमागृहांनी पुन्हा एकदा जम धरला आहे. प्रेक्षकांनी पुन्हा एकदा चित्रपटगृहांकडे आपली पावलं वळविली आहेत. शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटापासून सुरू झालेले हे वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीसाठी फलदायी ठरले आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. ‘गदर २’, ‘सत्यप्रेम की कथा’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’, ‘OMG २’ व ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटांनी प्रेक्षकांना पुन्हा एकदा चित्रपटगृहाकडे वळवलं आहे. (Jawan Box Office Collection)
शाहरुख खानच्या नेतृत्वाखालील देशभरातील ही भरभराट आणि उन्माद यामुळे त्याच्या आगामी जवान या रेकॉर्डब्रेक चित्रपटाच्या तिकिटांची आगाऊ विक्री झाली आहे. याचा अहवाल ही नुकताच समोर आला आहे. BookMyShow नुसार भारतात एकूण 7.5 लाख आगाऊ तिकिटे विकली गेली आहेत.
तिकीट विक्रीची सद्याची परिस्थिती पाहता व्यापार विश्लेषक तरण आदर्श म्हणाले, “एकूण हिंदी चित्रपटांची आताची परिस्थिती खूप सकारात्मक आहे. लोक पुन्हा एकदा चित्रपटगृहांकडे जाऊ लागली आहेत. त्यांना असे वाटले की हिंदी सिनेमा मृत झाला आहे आणि कोणीही तो पाहू इच्छित नाही, पण मला वाटते की गेल्या काही महिन्यांत संपूर्ण परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. हिंदी चित्रपटांसाठी हा काळ खूप छान आहे.”
उत्तर भारतात ‘जवान’ला ५००० स्क्रिन्स मिळाल्या आहेत तर संपूर्ण देशभरात तब्बल ५५०० स्क्रिन्सवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. इतकंच नव्हे तर काही बंद पडलेली सिंगल स्क्रीन थिएटरसुद्धा यानिमित्ताने पुन्हा सुरू होताना दिसत आहेत. एकूणच हे चित्र पाहता शाहरुख खानचा ‘जवान’ पहिल्याच दिवशी भारतात ६० ते ७० कोटींची कमाई करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. असं घडल्यास हा रेकॉर्ड करणारा ‘जवान’ हा पहिला चित्रपट ठरू शकतो.
अॅटली दिग्दर्शित ‘जवान’ या चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगातील नयनतारा व विजय सेतुपती यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. शिवाय दीपिका पदुकोणने ही चित्रपटात खास भूमिका साकारली आहे.