अभिनेत्री परिणीती चोप्राची लगीनघाई सुरु झालेली पाहायला मिळतेय. अभिनेत्री परिणीती चोप्रा व आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा उदयपूरच्या आलिशान लीला पॅलेस हॉटेलमध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. २३ व २४ सप्टेंबरला परिणीती व राघव यांचा हा लग्नसोहळा मोठ्या धुमधडाक्यात पार पडणार आहे. हे लग्न हिंदू पद्धतीने होणार असल्याचे बोललं जात आहे. या लग्नात बॉलीवूड तसेच हॉलिवूडबरोअबर देशातील अनेक बड्या राजकीय व्यक्ती सहभागी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान पाहुण्यांच्या स्वागतासाठी उदय विलास हॉटेल बुक करण्यात आले आहे. (Parineeti Chopra Wedding Date)
लीला पॅलेस व उदय विलास हॉटेलचे बुकिंग झाले असल्याचं सूत्रांच्या माहितीवरून समोर आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ सप्टेंबरला मेहेंदी, हळदी आणि महिला संगीताचा कार्यक्रम होणार आहे. तर परिणीती व राघव यांचा विवाह २४ सप्टेंबर रोजी होणार आहे. तर तेथील गुरुग्राममध्ये स्वागत कार्यक्रम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
अभिनेत्री परिणीती चोप्राची बहीण प्रियांका चोप्रा व तिचा पती निक जोनास देखील या लग्नाला उपस्थित राहणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची ही लग्नाला उपस्थिती असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
१३ मे ला परिणीती व राघव यांनी साखरपुडा करत सगळ्यांनाच सुखद धक्का दिला. दिल्लीतील कपूरथला हाऊस या ठिकाणी परिणीती व राघव यांचा थाटामाटात साखरपुडा पार पडला. यावेळी कलाक्षेत्रासह राजकीय विश्वातील दिग्गज मंडळी उपस्थित होती. आता दोघांचे कुटुंबीय लग्नाच्या तयारीला लागले आहेत. साखरपुड्यापूर्वी बरेच महिने परिणीती व राघवच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा रंगली होती. याबाबत सोशल मीडियावर बऱ्याच चर्चाही रंगल्या होत्या, मात्र दोघांनीही कधीच त्यांच्या नात्याचा उघडपणे स्वीकार केला नाही. साखरपुडा करत त्यांनी आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली.