akshay mudwadkar : ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ या लोकप्रिय मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अलीकडेच या मालिकेनं १२५० भागांचा टप्पा पार केला. स्वामी समर्थ महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या मालिकेला अजूनही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत अभिनेते अक्षय मुडावदकर यांनी स्वामी समर्थांची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. प्रेक्षकही अक्षयवर भरभरुन प्रेम करताना पाहायला मिळत आहेत. अक्षय यांना ही भूमिका कशी मिळाली, ही भूमिका मिळावी अशी त्यांच्या जवळच्या व्यक्तीने इच्छा व्यक्ती केली याचा खुलासा त्यांनी केला आहे.
अक्षय यांनी नुकतीच ‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ला मुलाखत दिली. यावेळी बोलताना अक्षय म्हणाले की, “आम्ही स्वामींची भूमिका करतोय तुम्ही स्वामींची भूमिका कराल का?, असं विचारताच मी संभ्रमात पडलो. स्वामी समर्थांचं नाव ऐकताच माझ्या अंगावर काटा आला. समोरुन ऑडिशनसाठी स्क्रिप्ट आली. माझ्या एका दिग्दर्शक मित्राच्या साहाय्याने मी स्वामी वेशात शूट केलं आणि पाठवलं. ते त्यांना फार आवडलं आणि त्यांनी मला लूक टेस्टसाठी बोलावलं. त्यानंतर बऱ्यापैकी गोष्टी पुढे गेल्या. त्यावेळी मला त्यांनी लूक टेस्टला केस काढशील का?, असं विचारलं”.
पुढे ते म्हणाले, “केस काढणं हा आपल्या घरी एक नाजूक विषय आहे. घरी आलो. माझी आजी सोफ्यावर बसली होती, घरी सांगितलं केस काढायला जायचं आहे, काम आलं आहे. घरुन होकार मिळताच मी केस काढून आलो. घरी आलो तर आमच्या घरात समोरच स्वामींचा खूप मोठा फोटो आहे. त्या फोटो समोर उभा राहिलो, आणि आजीला विचारलं, ‘आजी काही साम्य वाटतंय का?’. आजी म्हणाली, “हो. वाटतंय साम्य. तू अगदी असाच दिसतोयस. देव करो आणि यांचंच काम तुला मिळून जावो'”.
आणखी वाचा – श्वेता शिंदेंनीही सेलिब्रिट केला करवाचौथ, नवऱ्यासह दिल्या खास पोझ, पारंपरिक लूकमधील फोटो समोर
पुढे अक्षय म्हणाले, “ते म्हणतात ना वास्तू तथास्तु म्हणते तसं आहे ते. तिच्या तोंडून ते शब्द निघणं आणि आजचा दिवस साडे बाराशे मालिकेचे भाग पूर्ण झाले आहेत. चार वर्षांचा प्रवास पूर्ण झाला आहे. तिला असं का म्हणावंसं वाटलं असेल त्या क्षणाला आणि ती जे बोलली ते खरं झालं”.