‘इट्स मज्जा’च्या ‘आठवी-अ’ या सीरिजला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. डोंगरावरच्या एका छोट्याश्या खेडेगावातून हायस्कुलसाठी परगावी येणाऱ्या आभ्या व त्यांच्या खास मित्रांची साधी तरी प्रत्येकाला आपलीशी वाटणारी गोष्ट या सीरिजद्वारे दाखवण्यात आली होती. या सीरिजने अनेक दिवस प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे या सीरिजमध्ये येणाऱ्या अनेक ट्विस्ट्स व रंजक वळणांमुळे सीरिजच्या प्रत्येक भागासाठी प्रेक्षक आतुर असायचे. पण अखेर २५ भागांनंतर या सीरिजने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र या सीरिजच्या निरोपाबरोबरच ‘इट्स मज्जा’ने ‘दहावी-अ’ या सीरिजची घोषणा केली होती. तेव्हापासून अनेकांना ‘दहावी-अ’ची उत्सुकता लागून राहिली होती. (Dahavi-A Series first episode)
अशातच आता सर्वांसाठी एक खुशखबर आहे, ती म्हणजे ‘दहावी-अ’ ही सीरिज अखेर प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाली आहे. अनेकजण या सीरिजची आतुरतेने वाट बघत होते आणि प्रेक्षकांची ही उत्सुकता अखेर संपली आहे. ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस यायला अवघे काही दोन दिवस उरले आहेत. ‘दहावी-अ’ ही ‘इट्स मज्जा’ची आगामी नवीन वेबसीरिज येत्या ६ जानेवारीपासून म्हणजेच सोमवारपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. दर सोमवारी व गुरुवारी दुपारी १.३० वाजता ‘इट्स मज्जा’च्या युट्यूब चॅनेलवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
आणखी वाचा – अभिषेक-ऐश्वर्या पुन्हा दिसले एकत्र, नव्या वर्षाचे सेलिब्रेशन करुन भारतात परतले, ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष
२६ डिसेंबर रोजी शाहू कला मंदिर, सातारा येथे ‘दहावी-अ’चा भव्य ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. ‘इट्स मज्जा’चे शौरीन दत्ता, अंकिता लोखंडे, सीरिज दिग्दर्शक व मुख्य कलाकारांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. समस्त सातारकर आणि अनेक प्रेक्षकांनी या भव्य ट्रेलर लाँच सोहळ्याला हजेरी लावली होती. शाळेचं दहावीचे वर्ष हे कायमच सर्वांसाठी खास असते. शाळेत घालवलेल्या प्रत्येक खास आठवणींची शिदोरी घेऊन अनेकजण आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करतो. याच आठवणींचं भावविश्व ‘दहावी-अ’ सीरिजमधून पाहता येणार आहे.
दरम्यान, ‘आठवी-अ’च्या भरघोस यशानंतर आता ‘इट्स मज्जा’ आणि ‘मीडिया वन सोल्यूशन्स’ ‘दहावी-अ’ ही वेबसीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता या आगामी सीरिजमध्ये प्रेक्षकांना काय नवीन पाहायला मिळणार? या सीरिजमधून आता आणखी कोणती नवीन कथा दिसणार? आभ्या आणि त्याच्या खास मित्रांची ही नवीन गोष्ट कोणत्या आणखी नवीन वळणावर पोहोचणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना या सीरिजमधून मिळणार आहेत.