Maitricha Saatbara Character Poster : सध्या सर्वत्र व्हॅलेंटाईन वीक सुरु आहे. हा वीक केवळ प्रेमीयुगुलंच नाही तर मित्र-मैत्रिणीही साजरा करताना दिसतात. अशातच यंदाचा हा व्हॅलेंटाईन वीक खूप खास आहे कारण या वीकमध्ये मैत्रीच्या सातबाऱ्यावर नेमकं कोण असणार आणि त्यांचा स्वभाव कसा आहे याची फोड झाली आहे. हो. बरेच दिवसांपासून मराठी कलाविश्वात प्रत्येक कलाकार त्यांच्या मैत्रीच्या सातबाऱ्यावर कोणाचं नाव आहे याबाबत सांगताना दिसला. आता अखेर या खऱ्या मैत्रीच्या सातबाऱ्याचा राज समोर आला आहे. Media One Solutions Presents & Itsmajja Original ही आगळी वेगळी ‘मैत्रीचा ७/१२’ ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या वेबसीरिजमध्ये नेमके कोणते कलाकार दिसणार हे समोर आलं असून प्रेक्षकांची उत्सुकता आता अधिक वाढली आहे.
या मराठी वेबसीरिजमधील पात्रांचे पोस्टर आता समोर आले आहेत. त्यामुळे यामध्ये कोणते कलाकार दिसणार आणि ते कोणत्या भूमिकेत दिसणार हेदेखील उलगडलं आहे. या सीरिजमधील पहिलं नाव म्हणजे स्टाईलचा बादशाह, बाईकचा दिवाना आणि न्यायाचा शिलेदार दौलत, रुबाबदार अंदाजाचा जबाबदार पट्ठ्या त्याच्या डॅशिंग अंदाजात मैत्रीच्या सातबाऱ्यावर काय धुमाकूळ घालणार हे पाहणं रंजक ठरेल. तर दुसरा म्हणजे आजचा स्ट्रगलर आणि उद्याचा सुपरस्टार, खट्याळ, खोडकर आदित्य, स्ट्रगल सुरु असला तरी हार न मानणारा असा स्ट्रगलर आणि कूल आदित्य त्याच्या खोड्यांनी मैत्रीचा सातबारा कसा गाजवणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. तर या वेबसीरिजमधील तिसरे पात्र म्हणजे न बोलता मनातील समजणारा आणि प्रत्येक समस्येचं उत्तर शांततेत शोधणारा, पेशाने डॉक्टर आणि शांतता हेच ज्याचं मूळ औषध असा सिद्धार्थ. मैत्रीच्या सातबाऱ्यावरील शांत, समजूतदार असा सिद्धार्थ त्याच्या संयमाने या मैत्रीच्या सातबाऱ्यावरील अडथळ्यांना कोणते औषध देऊन पळवणार हे पाहायलाही आवडेल.
आणखी वाचा – ५८ वर्षीय पाकिस्तानी मौलानाशी राखी सावंत करणार लग्न?, अभिनेत्रीचा मोठा निर्णय, म्हणाली, “म्हातारा…”
प्रत्येक मैत्रीत एक दबंग गर्ल असणं आवश्यक आहे. मैत्रीच्या सातबाऱ्यावरही अस्सल पुणेकर, स्वतःच्या मतावर ठाम अशी दबंग गर्ल संचिता. तिने तिच्या बॉसी लूकने आणि क्लासी अदेने तिचा स्वतःचा असा दर्जा मेंटेन केला आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. यानंतर येते ती म्हणजे जिद्दी, मेहनती आणि आपल्या हास्याने साऱ्यांचं मनं जिंकणारी, आत्मविश्वासाच्या धारेवर जीवन चालवणारी, हास्यात कायम गोडी आणि स्वभावात सुंदरता असलेली कॅफे मालकीण योगिता. ‘योगिज् कॅफे’ या नावाने कॅफे चालवणारी ही योगिता मैत्रीच्या सातबाऱ्यावर कोणते चविष्ट पदार्थ बनवणार हे पाहायलाही आवडेल. तर या मैत्रीच्या सातबाऱ्यावरील शेवटचे पात्र छाया. संस्कारी, शांत अशी छाया तिच्या बहिणीच्या कॅफेमध्ये काम करते, थोडीशी लाजऱ्या स्वभावाची ही छाया मात्र सुगरण आहे, आता ही छाया मैत्रीच्या सातबाऱ्यात संस्कारांचे धडे कसे गिरवणार हे पाहणं रंजक ठरेल.
Media One Solutions Presents & Itsmajja Original ही आगळी वेगळी वेबसीरिज ‘मैत्रीचा ७/१२’ येत्या २६ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सज्ज होत आहे. ‘मैत्रीचा ७/१२’ या नव्याकोऱ्या वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा अजय पवार यांनी पेलवली आहे. कथा-पटकथा शुभम पाठक यांची असून संवाद ऋषिकेश डी. वाय. पवार यांचे आहेत. तर काही मोजक्या एपिसोडचे संवाद कल्पेश जगताप यांनी लिहिले आहेत. तर निर्मितीची जबाबदारी शौरीन दत्ता यांनी सांभाळली आहे. तसेच या सीरिजच्या क्रिएटीव्ह व प्रोजेक्ट हेड अंकिता लोखंडे या आहेत. ‘मैत्रीचा सातबारा’मधून तेजस कुलकर्णी, अभिजीत पवार, आर्या राणी, ऋषिका कदम, अजय इंगावले आणि प्रियंका गांधी हे नवीन चेहरे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. येत्या २६ फेब्रुवारीपासून सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ७.०० वाजता ‘मैत्रीचा ७/१२’ ही नवीकोरी सीरिज ‘इट्स मज्जा’च्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर पाहता येणार आहे.