Nupur Shikhare and Ira Khan Marriage : आमिर खानची लाडकी लेक आयरा खान व नुपूर शिखरे यांनी ३ जानेवारी रोजी नोंदणी पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा मुंबईतील ताज एंड येथे उरकला. यानंतर हे नववरवधू त्यांच्या शाही रिसेप्शन सोहळ्यासाठी राजस्थान येथे पोहोचले आहेत. उदयपूरच्या ताज लेक पॅलेसमध्ये या जोडप्याच्या शाही लग्नाच्या सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे. आयरा-नुपूरच्या जवळच्या नातेवाईकांच्या व मित्र परिवाराच्या उपस्थितीत हा शाही रिसेप्शन सोहळा पार पडणार आहे. यावेळी त्यांच्या लग्नासाठी राजस्थानी थाटमाट पाहायला मिळणार आहे.
७ जानेवारीला रोमँटिक वेलकम डिनर पार्टीनंतर आज या जोडप्याच्या मेहंदी समारंभाचा आयोजन करण्यात आलं आहे. आयराने तिच्या इन्स्टाग्रामवर मेहेदी सोहळ्यासाठीच्या तिच्या खास लूकची झलक शेअर केली आहे. आमिर खानची लेक आयराच्या हातावर नुपूर शिखरेच्या नावाची मेहंदी लागणार आहे. आयराने तिच्या मेहेंदीचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. आयराने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती वॉकी टॉकी हातात घेऊन तयारीदरम्यान तिची हेरगिरी करणाऱ्या टीमची तक्रार करत होती.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये आयरा मेहंदीसाठी तयार होताना दिसत आहे. यावेळी मेहंदी समारंभासाठीचा आयराचा लूक समोर आला आहे. आयराने मेहंदीसाठी घागरा चोळी परिधान केली आहे. पांढऱ्या रंगाच्या एम्ब्रॉयडरी असलेला तिचा ब्लाउज लक्षवेधी ठरत आहे. या दरम्यान आयराचा मेकअप सुरु असलेला पाहायला मिळत आहे. मेहंदीसाठीच्या लूकमध्ये आयराने सोनेरी व मोत्याचे दागिने परिधान केलेले दिसत आहेत.
काल रात्री आयरा व नुपूर शिखरे यांनी वेलकम डिनर पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत आयराने काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. त्यावर साधासा असा नेकलेसही तिने घातला होता. तर नुपूरने काळा शर्ट व पॅन्ट घातली होती. या सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकर गाणं गाताना दिसली. यादरम्यान, आयरा व नुपूरने रोमँटिक डान्सही केला. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये आमिरची माजी पत्नी किरण राव पाहुण्यांचं स्वागत करत त्यांच्याशी गप्पा मारताना दिसत आहे. आयरा खान ही आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ताची मुलगी आहे. आयरा व नुपूर जोडप्याच्या लग्नाचे कार्यक्रम ७ जानेवारीपासून सुरू झाले असून १० जानेवारीला लग्नसोहळ्याने त्यांची सांगता होणार आहे.