‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे विनोदी कलाकारांना त्यांची एक वेगळीच ओळख मिळाली. यापैकी काही कलाकारांनी आपल्या आयुष्यात चढ-उतार पाहिले आहेत. त्यातीलच एक आघाडीचे कलाकार म्हणजे श्याम राजपूत. श्याम यांनी ‘इट्समज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. यादरम्याने त्यांनी आपला जीवनप्रवास उलगडला. इंजिनिअर ते अभिनेता असा प्रवास करताना कुटुंबाने किती खंबीर साथ दिली तसेच करिअरच्या सुरुवातीला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला हे त्यांनी सांगितले. याबरोबरच त्यांनी आपल्या आयुष्यातील एक सुखावह प्रसंग म्हणजे त्यांची प्रेमकहाणीही शेअर केली आहे. प्रेमकहाणीला नक्की सुरुवात कशी झाली? आणि यामध्ये पत्नीने साथ कशी दिली? यावर श्याम यांनी भाष्य केले आहे. (Actor Shyam Rajput lovestory)
‘मज्जाचा अड्डा’ या कार्यक्रमामध्ये श्याम यांना त्यांची “प्रेमकहाणी कशी सुरू झाली?”, हे विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, “खऱ्या आयुष्यातील प्रेमकहाणीबद्दल सांगायचे झाले तर माझी जी बायको आहे तिचे मला स्थळ आले होते. पण मी कशामध्येच स्थिरस्थावर नव्हतो. लग्न करायचे म्हणजे पैशांचा प्रश्न येतोच. त्यामुळे मुलगी कशी बघायची हा प्रश्न होता. पण त्यावर घरचे व मित्र-मंडळी म्हणाली की जा मुलगी बघून ये. मग आम्ही दोघंही पहिल्यांदा भेटलो. भेटल्यानंतर आमची मने जुळली. पण मी तिला आधीच माझ्या करिअरबद्दल सांगितलं होतं की माझं असं आहे. किती पैसे कमवेन, किती नाही याबद्दल काहीही कल्पना नाही. त्यावेळी मी केवळ सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनच काम करत होतो जास्त काही काम नव्हतो. मी म्हंटल जे आहे हे असं आहे. त्यावर ती म्हणाली मला काहीही अडचण नाही आणि नंतर तीन चार महीने आम्ही परस्पर एकमेकांना भेटू लागलो होतो”.
पुढे ते म्हणाले की, “तिच्या घरच्यांचा प्रश्न होता की तो जर व्यवस्थित कमवत नाही तर कसं होणार? पण ती तिच्या मतावर ठाम होती आणि मी माझ्या मतावर ठाम होतो. तिने तिच्या घरच्यांना तयार केले आणि आमचे लग्न झाले. पण त्यामध्ये इतका असा काही ड्रामा झाला नाही”, असंही ते म्हणाले.
त्यानंतर “इतका कमी बोलणारा व्यक्ती सलग तीन-चार महीने एका मुलीला भेटला, ते कसं काय जुळून आलं?” असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर श्याम यांनी हसत सांगितले की, “भिकारी को मिली भीक, जितनी मिले उतनी ठीक” असे म्हणतात तसेच काहीसे झाले. लग्न होतंय हेच खूप होतं माझ्यासाठी. त्यात इतकी सुंदर मुलगी मिळतेय तर लग्न होतंय तर होऊदे, असं माझं झालं आणि सरतेशेवटी लग्न झालं. पण आतापर्यंतच्या माझ्या सर्व प्रवासामध्ये माझ्या बायकोने माझी खूप साथ दिली आहे. माझ्या प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये माझ्यासोबत राहिली”. श्याम यांनी पहिल्यांदाच आपल्या खासगी आयुष्याबाबत खुलेपणाने भाष्य केलं.