Anup Ghoshal Passes Away : लोकप्रिय गायक अनुप घोषाल यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७८व्या वर्षी त्यांनी कोलकत्ता येथे अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळाने त्यांचं निधन झाल्याचं समोर आलं आहे. मागील अनेक दिवसांपासून ते रुग्णालयात होते. अखेर १५ डिसेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनुप हे वृद्धापकाळाच्या समस्यांशी झगडत असताना शुक्रवारी दुपारी १.४० वाजता त्यांनी जगाचा निरोप घेतला. अनुप यांच्या निधनानं त्यांच्या कुटुंबावर व चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
गायक अनुप घोषाल यांची बंगाली भाषेतील गाणी लोकप्रिय ठरली. याशिवाय अनेक हिंदी चित्रपटातील गाण्यांसाठीही त्यांनी आपला आवाज दिला होता. अनुप घोषाल यांना आजही ‘मासूम’ चित्रपटातील ‘तुझसे नाराज नहीं जिंदगी’ या गाण्यासाठी ओळखलं जातं. अनुप घोषाल यांचं निधन वृद्धापकाळामुळे निधन झालं असून त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
गायक म्हणून अनुप घोषाल यांनी सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवला तसेच ते राजकारणात ही सक्रिय होते. २०११ मध्ये तृणमूल काँग्रेसने त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली होती. आणि ही निवडणूक ते जिंकले होते. माजी तृणमूल आमदार अनुप घोषाल यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही दु:ख व्यक्त केलं. अनुप घोषाल यांच्या जाण्याने संगीत क्षेत्राला मोठं नुकसान झालं आहे, अशा शब्दांत ममता बॅनर्जीं यांनी शोक व्यक्त केला आहे.
संगीत क्षेत्रात अनुप घोषाल यांचं मोठं योगदान आहे. त्यांनी बंगाली भाषेतील गाण्यांसह हिंदी चित्रपटातील गाण्यांसाठीही आवाज दिला. ‘तुझसे नाराज नहीं जिंदगी’, ‘जिनके हृदय श्रीराम बसे’, ‘मन के मंदिर में’, ‘गुरु बिन’, ‘अंखिया हरिदर्शन को प्यारी’, ‘मोहे लागी लगन’, ‘मधुर अमर’ यांसारखी अनेक गाणी त्यांनी गायली आहेत.