आई-वडिलांचं सुख वाट्याला आलं की, आम्ही भाग्यवान आहोत अशी भावना प्रत्येकाच्या मनात असते. पण हेच सुख कित्येकांच्या वाट्याला येत नाही. यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री मुग्धा शाह. कलाक्षेत्रातील यशस्वी अभिनेत्रींपैकी मुग्धाही टॉपला आहेत. मात्र या हसऱ्या चेहऱ्यामागे इतकं दुःख दडलेलं असावं याची पुसटशीही कल्पना कोणाला नव्हती. त्या तीन महिन्यांची असतानाच त्यांची आई गेली. त्यानंतर वडिलांनीही दुसरं लग्न केलं. त्यामुळे सावत्र आईकडूनही छळ, मानसिक त्रास झाला. आईची माया आयुष्यभर त्यांना मिळालीच नाही. वडील असूनही नसल्यासारखी भावना मुग्धा यांनी व्यक्त केली. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील संपूर्ण वाईट काळ सांगितला. (Actress mugdha shah after marriage struggle)
वडील असूनही नसल्यासारखेच होते
एकवेळ वडील नसले तरी चालतील पण आई हवी हा विचार मुग्धा यांच्या मनात कायम घर करुन राहिला. मनोरंजन विश्व मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “वडील असूनही नसल्यासारखे होते. कारण त्यांना त्यांचं कुटुंब होतं. त्यांची दोन मुलं होती. त्यामुळे ते इच्छा असूनही काही करु शकत नव्हते. माझ्यासाठी ते नव्हतेच. आजही ते माझ्यासाठी नाहीच आहेत. त्यामुळे एकटेपणा, मजबुरी, लाचारी, भूक, छळ यामध्ये आयुष्याची २० वर्ष काढली”.
आणखी वाचा – तीन महिन्यांची असताना आई गेली, वडिलांचं दुसरं लग्न, छळ अन्…; ऋता दुर्गुळेच्या सासूबाईंचा वाईट काळ
अजून मी जिवंत कशी? हाच प्रश्न
“लग्नानंतर सगळं नीट होईल असं वाटलं. पण तिथेही काही विशेष असं नव्हतं. कोणीही प्रेम, लाड, कौतुक करणारं नव्हतं. माझ्याच वाट्याला हे सगळं आलं आहे. मला कधीच कोणाचं प्रेम मिळालं नाही. ना माहेर ना सासर कधीच प्रेम नाही. प्रत्येकवेळी बरोबरी व्हायची. लग्न केल्यानंतर सासू नणंदेबरोबर बरोबरी करायची. सावत्र आईकडे होते तेव्हा ती सावत्र बहिणीबरोबर बरोबरी करायची. त्याच्यामुळे नेहमी मला पाण्यात बघितलं जायचं. मलाच माहित नाही की, मी अजूनपर्यंत जिवंत कशी?. मी आता इतकं सुंदर आयुष्य जगते हेही विश्वास बसत नाही. मला असं वाटायचं एवढं वाईट झालं यापेक्षा आपल्याबरोबर अजून काय वाईट होऊ शकतं. जे येईल ते होईल असं मी आयुष्य जगणं ठरवलं होतं”.
सासूने घराबाहेर काढलं, लग्नानंतर लगेचच गरोदर आणि…
“लग्नानंतरही विशेष काही घडामोडी झाल्या नाहीत. फक्त दोन वेळेचं जेवण मिळालं इतकंच झालं. शेजारी मी जाऊन सांगायचे की, दोन दिवस काय खाल्लं नाही काही खायला आहे का?. माझ्या सासरी तेव्हा खूपच वाईट अवस्था होती. डिसेंबरमध्ये आमचं लग्न झालं. आणि दोन महिन्यांनी सासूने मला व माझ्या नवऱ्याला घराबाहेर काढलं. काहीच कारण नसताना हे झालं. सासू नावाच्या व्यक्तीला असुरक्षितता असते ना तसंच काहीसं होतं. चांगल्या होत्या. पण सून आल्यानंतर ती वर्चस्व दाखवणार असं त्यांना बहुदा वाटलं असावं. त्यातही लग्न झाल्यानंतर मला पाळीच आली नाही. मी लगेचच गरोदर राहिले. घरातून बाहेर काढल्यानंतर मी कोणाकडे जाणार?. भाडं कसं देणार? काहीच मला शक्य नव्हतं. माझ्या नवऱ्यालाही तेव्हा फक्त ६५० पगार होता”. मुग्धा यांच्या यशापाठी त्यांची खूप मेहनत आहे हे यामधून लक्षात येतं. इतकंच काय तर यशस्वी चेहऱ्यामागे एकटेपणाची भावना अजूनही त्यांच्या अंगावर येते.