बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन व अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा बहुचर्चित ‘फायटर’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये चांगलाच चालला. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने २६ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने आतापर्यंत देशभरात २११ कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले असून जगभरात ३३६ कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची अधिक पसंती मिळाली. पहिल्यांदाच हृतिक व दीपिका ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. दोघांमधील केमेस्ट्री बघून या प्रेक्षकांनी या जोडीचे कौतुक केले आहे. पण आता हा चित्रपट ओटीटीवर कधी येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. (Fighter movie OTT release)
हृतिक व दीपिका यांचा ‘फायटर’ हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये येऊन ३५ दिवसांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. या चित्रपटाची घोडदौड आता संथ झाली असून लवकरच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होऊ शकतो अशी चर्चा होती. तसेच या चित्रपटाचे ओटीटी राईट्स मोठ्या रक्कमेने एका ओटीटी प्लॅटफॉर्मला विकणार असल्याचेही बोलले जात होते. या चर्चांना आता फायटरच्या निर्मात्यांनी पूर्णविराम दिला असून कधी व कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे हे जाहीर केले आहे.
आणखी वाचा – “हिंमत असेल तर…”, ट्रोल करणाऱ्यांवर भडकल्या जया बच्चन, म्हणाल्या, “तुमचा चेहरा…”
हृतिक,दीपिका व अनिल कपूर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘फायटर’ चित्रपटाने जगभरातून ३०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. हा चित्रपट २१ मार्च २०२४ रोजी ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. ‘नेटफ्लिक्स’ने या चित्रपटाचे ओटीटी राईट्स तब्बल १५० कोटी रुपयांना खरेदी केले असल्याची माहिती मिळत आहे.
‘फायटर’च्या कलेक्शनबद्दल सांगायचे झाले तर पहिल्या दिवशी या चित्रपटाने तब्बल ४० कोटी रुपयांची कमाई केली होती. २०१९ साली झालेल्या पुलवामा व बालाकोट येथील हवाई हल्ल्याची पार्श्वभूमी या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात हृतिक व दीपिकाबरोबर अनिल कपूर, करण सिंह ग्रोवर, अक्षय ओबेरॉय व संजीदा शेख यांनीदेखील भूमिका सकारल्या आहेत. आता या चित्रपटाला ओटीटीवर प्रेक्षकांचा किती प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.