‘झी मराठी’ वाहिनीवर गेली वीस वर्ष अव्याहतपणे सुरु असलेल्या ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाने नुकताच विराम घेतला आहे. या निमित्ताने एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये झी मराठीवरील विविध मालिकांमधील महिला कलाकार सहभागी झाल्या होत्या आणि त्यांच्यामध्ये पैठणीसाठी खेळ रंगला. यावेळी ‘होम मिनिस्टर’ची धुरा आपल्या खांद्यावर सांभाळणारे महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांना ‘तुला शिकविन चांगलाच धडा’ फेम अधिपती-अक्षरा यांनी बोलतं केलं. यावेळी आदेश यांना काही खास फोटो दाखवण्यात आले आणि या प्रत्येक फोटोबद्दल आदेश यांनी त्यांच्या काही खास आठवणी सांगितल्या आहेत. (Aadesh and Suchitra Bandekar Emotional)
यावेळी अधिपती-अक्षरा यांनी आदेश बांदेकरांना सूचित्रा बांदेकरांबरोबरचा लग्नातील एक जुना फोटो दाखवण्यात आला. या फोटोवर आदेश बांडेकरांनी व्यक्त होत असं म्हटलं की, “विश्वास… कारण खिशात काही नव्हतं आणि पुढे काय होणार हे काहीच माहीत नव्हतं. तेव्हा सूचित्राने माझ्यावर विश्वास ठेवून लग्न केलं. हा फोटो बोरिवलीच्या आमच्या वन रुमच्या हॉलमध्ये काढलेला फोटो आहे. घराच्या बाहेर एक छोटासा लग्नाचा विधी करण्यात आला होता. तेव्हाचा हा फोटो आहे. हा लग्नसोहळा आज इतक्या वर्षांनंतर पाहताना एखाद्या मोठ्या राजमहालातील लग्नापेक्षाही दिमाखदार पद्धतीने झाल्यासारखा मला वाटतो”.
आणखी वाचा – Bigg Boss च्या घरात सूरजला हवी आहे मैत्रीण, ‘बिग बॉस’ने विचारताच लाजला, म्हणाला, “साडी नेसणारी…”
यापुढे अक्षराने सूचित्रा यांना त्यांच्या भावना विचारल्या. त्याबद्दल सूचित्रा असं म्हणाल्या की, “आता या क्षणी मीही भावुक झाले आहे. पण मला वाटतं आपण एखादी गोष्ट अगदी मनापासून करतो. तेव्हा वास्तू किंवा देव आपल्याला तथास्तु म्हणत असतो. तसच माझं आदेशच्या बाबतीत झालं. प्रत्येकवेळी आदेशने जे काही काम असले ते इतकं मनापासून केलं की, त्यामुळे त्याला ते यश मिळालं. आजवरचा आदेशचा प्रवास बघून मला छान वाटत आहे, कारण आदेशने कधीच कोणत्याच गोष्टीचा आळस केला नाही किंवा कोणत्याही गोष्टीचा गैरफायदा घेतला नाही. त्याच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक स्त्रीला आणि कामाला त्याने आदर दिला. त्याचं फलित म्हणून आज तो आज इथे बसला आहे”.
दरम्यान, ‘दार उघड बये… दार उघड…’ अशी हाक साधारण २० वर्षांपूर्वी ऐकू आली आणि पैठणीचा खेळ रंगायला सुरुवात झाली. आदेश बांदेकर यांच्या ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचा पहिला भाग १३ सप्टेंबर २००४ मध्ये भेटीला आला होता. आदेश बांदेकर ते लाडके भावोजी हा प्रवास साधारण २० वर्षांचा प्रवास प्रत्येकासाठी खासच आहे. पण आता हा प्रवास शेवटाला अखेर २० वर्षांनी आदेश भावोजींनी गृहिणींचा निरोप घेतला आहे.