ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वयाच्या ७४व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तळेगाव दाभाडेजवळील आंबी गावात ते भाड्याच्या घरात राहत होते. राहत्या घरातच रवींद्र महाजनी मृत अवस्थेत आढळले. मागील आठ महिने या घरामध्ये ते एकटेच राहत असल्याची माहिती त्यांच्या शेजारच्या मंडळींनी दिली. यावरुनच त्यांचा मुलगा व मराठी अभिनेता गश्मीर महाजनी तसेच रवींद्र महाजनी यांच्या कुटुंबियांवर टीका करण्यात आली.(Hemangi Kavi on ravindra mahajani death)
सोशल मीडियाद्वारे गश्मीरला नेटकऱ्यांनी सुनावलं. मात्र अशा प्रसंगी नेटकऱ्यांचं हे वागणं पाहून मराठी अभिनेत्री हेमांगी कवीला राग अनावर झाला आहे. हेमांगीने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला. हेमांगी म्हणाली, “आपण कोण झालो आहोत? काल जेष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी गेल्याचं कळलं. अर्थात आधी सोशल मीडियाद्वारे नंतर प्रसार माध्यामांमधून ही बातमी कळाली”.
“पण ते गेले यापेक्षा ते ‘कसे’ गेले याचीच बातमी सर्वत्र जास्त पसरली. जाणाऱ्याला नीट जाऊ तरी द्या रे! बातमी देणाऱ्यांची आता ती स्टाइलच झाली आहे. त्याशिवाय लोकं बातमीच बघत नाहीत असं त्यांना वाटतं. त्यांचा दोष नाही. शेवटी प्रत्येकाला पोट आहेच. पण त्या बातमीवर आलेल्या कमेंट्स वाचून माणूसपणाची सिसारी आली. ते इतकं अंगावर आलं की श्रध्दांजली वाहणं नकोसं झालं”.
गश्मीर बद्दल हेमांगी म्हणाली…(Hemangi Kavi on ravindra mahajani death)
“त्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीही माहीत नसताना वाटेल ते बोलत सुटले लोक. त्यांचा मुलगा तसेच पत्नीबाबतही बोललं गेलं. असं मरण अनेक लोकांना येत असावं पण केवळ ते अभिनेते होते, प्रसिद्ध होते म्हणून वाटेल ते बोलण्याचा परवाना आपण घेतला. ज्या हिरोला आपण लहानपणापासून पाहत आलोय त्यांच्यासह काम करण्याची संधी मिळणं मला अविश्वसनीय वाटतं. ‘रंगीबेरंगी’ सिनेमात तुमच्या बरोबर तुमच्या मुलीचं काम करण्याचं भाग्य मला लाभलं. रवींद्रजी जिथं कुठं आहात तिथं शांत असाल आणि आम्हांला माफ कराल अशी मी आशा करते”.(ravindra mahajani death)

“गश्मीर महाजनी आधीच इतका खडतर प्रवास करुन तू उभा आहेस. त्यात आता याची भर. सोशल मीडियाद्वारे किंवा कुठेही व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे. पण जरा तार्तम्य ठेवलं तर चालणार नाही का? बातमी देणाऱ्यांना चेहरा नाही पण आपल्याला आहे. हे थोडं लक्षात ठेऊया”. हेमांगीने अगदी स्पष्ट शब्दांमध्ये तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच रवींद्र महाजनी यांच्याबरोबर काम केल्याचा उल्लेखही तिने केला.