Ameen Sayani Iconic Voice of Geetmala on All India Radio Dies : ‘बिनाका गीत माला’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे आयकॉनिक रेडिओ सादरकर्ते अमीन सयानी यांचं निधन झालं आहे. २० फेब्रुवारी मंगळवार रोजी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ९१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सयानी यांचा मुलगा राजील सयानी यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला वडिलांच्या मृत्यूबाबत माहिती दिली. मंगळवारी रात्री त्यांच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर त्यांना मुंबईतील ‘एचएन रिलायन्स’ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यावेळी त्यांचं निधन झालं होतं. राजिलने वडिलांबाबत माहिती देत म्हटले की, “रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने उपचार केले पण त्यांना वाचवता आले नाही. त्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.” (Ameen Sayani Passed Away)
सयानी यांच्यावर गुरुवारी अंत्यसंस्कार होणार असल्याच समोर आलं आहे. अमीन सयानी यांचा जन्म साहित्याला अधिक प्राधान्य देणाऱ्या कुटुंबात झाला. त्यांची आई ‘रेहबर’ नावाचे वृत्तपत्र चालवत असे आणि त्यांचा भाऊ हा प्रख्यात इंग्रजी प्रसारक हमीद सयानी हे होते. आमीन सयानी यांनी १९५२ मध्ये ‘रेडिओ सिलोन’मधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.
“नमस्कार भाईयों और बेहनो, मैं आपके दोस्त अमीन सयानी बोल रहा हूँ”, देशभरातील प्रत्येक घरात मोठ्या लाकडी पेट्यांसारख्या रेडिओमधून हा घुमणारा आवाज आज हरपला. जेव्हा ‘ऑल इंडिया रेडिओ’ने बॉलीवूड नंबरच्या प्रसारणावर बंदी घातली तेव्हा अमीन यांचा शो हिट झाला. देशभरातील लोकांशी जोडले जाणारे अमीन हे हिंदुस्थानी भाषेच्या प्रचाराचेही एक माध्यम होते.
‘बिनाका गीत माला’ हा ३० मिनिटांचा कार्यक्रम १९५२ मध्ये सुरु होऊन अर्धा दशक चालू राहिला. यावेळी त्यांच्या शोचे अनेकदा नाव बदलले. ‘बिनाका गीत माला’, ‘हिट परेड’, ‘सिबाका गीतमाला’ अशी अनेक नाव या शोला देण्यात आली. त्या काळाची आठवण करुन देताना अमीन यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, “प्रत्येक श्रोत्याला मी त्यांच्याशी बोलतोय असे वाटावे अशी माझी इच्छा होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, रेडिओ सादरीकरणातही क्रांती झाली. येत्या काही वर्षात ही घटना घडेल अशी मला अपेक्षा नव्हती.”