Marathi Art Director Nitin Desai Commits Suicide : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी एन.डी. स्टुडिओमध्ये गळफास घेत आत्महत्या केली आहे. नितीन देसाई यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. कलाकार मंडळी नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहत आहेत. तसेच सोशल मीडियाद्वारेही नितीन देसाई यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला जात आहे. अमोल कोल्हे, आदेश बांदेकर, सुबोध भावे, अभिजीत पानसे यांसारख्या मंडळींनी नितीन देसाई यांच्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. तर महेश कोठारे व महेश मांजरेकर यांनी आमच्या अत्यंत जवळचा मित्र गेला अशी भावना व्यक्त केली आहे. (Mahesh Manjrekar on Nitin Desai)
महेश मांजरेकरांनी ‘टीव्ही ९’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी नितीन देसाई यांच्याबरोबर असलेल्या मैत्रीपूर्ण नात्याविषयी भाष्य केलं. ते म्हणाले, “अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. कला दिग्दर्शकपेक्षा नितीन देसाई माझे सगळ्यात जवळचे मित्र होते. मला याक्षणी काहीच कळत नाही. माणसाच्या डोक्यात काय सुरु असतं हेही समजायला मार्ग नाही”.

“मित्र म्हणून आपण कधी फोन करत नाही, बोलत नाही. पण या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. माझ्या ‘पिताह’ नावाच्या चित्रपटाचा सेट त्यांनीच उभारला होता. कला दिग्दर्शक म्हणून ते खूप ग्रेट होते. संजय लीला भन्साळी यांच्यापासून ते आशुतोष गोवारीकर यांच्या अनेक चित्रपटांचे सेट त्यांनी उभारले. त्यांनी कलाविश्वात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. चित्रपटसृष्टीचं खूप मोठं नुकसान झालं आहे. मित्र म्हणून त्यांच्याशी बोलायलं हवं होतं असं मला वाटतं. दोन ते तीन महिन्यांपूर्वी आम्ही शेवटचं बोललो. मी त्यांना जेव्हा शेवटचं पाहिलं तेव्हा ते मला थोडे दुःखी वाटले. पण असा नितीन देसाई पुन्हा होणे नाही”.
त्याचबरोबरीने अभिनेते महेश कोठारे यांनीही ‘टीव्ही ९’शी बोलताना दुःख व्यक्त केलं. ते म्हणाले, “माझ्या पायाखालची जमीनच सरकली आहे. ‘झपाटलेला २’ चित्रपटाचं संपूर्ण प्रॉडक्शन डिझाईन त्यांनी स्वतः केलं होतं. काहीही असलं तरी ते स्वतः मला फोन करायचे. ही खूप मोठी धक्कादायक बातमी आहे. त्यांनी आत्महत्या करणं हे तर खूपच धक्कादायक आहे. त्यांचं व माझं बोलणं सतत व्हायचं. त्यांच्या मुलीचं जेव्हा लग्न झालं तेव्हाही त्यांनी मला या लग्नाला बोलावलं होतं. त्यांनी त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला मला बोलावलं आहे. नितीन देसाई व माझं खूप वेगळं आणि जवळचं नातं होतं. आत्महत्या हा काही पर्याय नाही”. अजूनही नितीन देसाई यांच्या आत्महत्येचं कारण समोर आलेलं नाही.