Famous Actress Face Road Rage : मुंबईत पहाटेच्या सुमारास एका अभिनेत्रीबाबत घडलेल्या प्रकाराने पुन्हा एकदा शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. ‘मिसेस देशपांडे’ या वेब सीरिजमुळे ओळख मिळवलेल्या अभिनेत्री निमिषा नायर हिच्या कॅबचा दोन तरुणांनी पाठलाग केल्याची घटना समोर आली असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई सुरू केली.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे सुमारे ४.४५ वाजण्याच्या दरम्यान निमिषा वर्सोवा येथील घरातून दक्षिण मुंबईतील नरिमन पॉइंटकडे कामानिमित्त निघाली होती. प्रवासादरम्यान वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील खेरवाडी उड्डाणपुलाजवळ तिच्या कॅबच्या पुढे एक स्कूटर गेल्यानंतर हा प्रकार घडला. स्कूटरवर असलेल्या दोघा तरुणांनी कॅबचा पाठलाग करत वाहन अडवलं आणि चालकासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी शिवीगाळही केल्याचं समोर आलं आहे. घटनेदरम्यान निमिषा कॅबच्या मागील सीटवर बसलेली होती. परिस्थिती गंभीर वाटू लागल्याने तिने त्वरित मोबाईलवर संपूर्ण प्रकाराचं चित्रीकरण केलं. धक्कादायक बाब म्हणजे, त्या दोघांनी कॅबचा दरवाजा उघडण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप तिने आपल्या तक्रारीत केला आहे. मात्र, आपण व्हिडीओ शूट करत असल्याचं लक्षात येताच संबंधितांनी तिथून पळ काढला.
आणखी वाचा – भारती सिंहचा लेक दिसतो इतका क्युट, पहिल्यांदाच दाखवला चेहरा, हुबेहूब…
या घटनेनंतर निमिषाने तिच्या सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत थेट मुंबई पोलीस आयुक्तांना टॅग केलं. त्यानंतर बुधवारी खेरवाडी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत आरटीओच्या मदतीने स्कूटरचा नंबर शोधून काढला आणि दोघा संशयितांचा मागोवा घेतला. पोलिसांच्या नोटिशीनंतर ते आपल्या पालकांसह पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, कॅबने त्यांच्या स्कूटरला घासून गेल्यामुळे त्यांनी चालकासोबत वाद घातला, मात्र प्रवासी महिलेला कोणतीही इजा केली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
आणखी वाचा – हातावर मेहंदी काढणं हिना खानला पडलं महागात, रोजा न ठेवल्याने नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले, “ईद दोन दिवस…”
दरम्यान, या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर पोलिसांनी आवश्यक ती कायदेशीर कारवाई करत दोघांना नोटीस देऊन सोडून दिलं आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा रस्त्यांवरील वाद आणि त्यातून उद्भवणाऱ्या धोकादायक परिस्थितीबाबत जागरूक राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. सध्या या घटनेची शहरभर चर्चा सुरू असून, सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.





