Actress Talk about Past Relationship : अभिनेत्री निती टेलर सध्या ‘अलायन्स’ या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये नितीने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एका कटू अनुभवाचा खुलासा केला होता. तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबतच्या नात्यादरम्यान तिला सिगारेटने चटके देण्यात आले होते, असा धक्कादायक अनुभव तिने शेअर केला. त्यानंतर तिच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली. शोमध्ये नितीने एका स्पर्धकाशी संवाद साधताना तिच्या पायावरील सिगारेटच्या चटक्यांच्या खुणाही दाखवल्या होत्या. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी अभिनेत्रीच्या भूतकाळाबद्दल प्रतिक्रिया दिल्या. मात्र, नितीने आता या संपूर्ण प्रकरणावर आपली बाजू स्पष्ट केली आहे.
आणखी वाचा – शूटिंगदरम्यान सुप्रसिद्ध अभिनेत्रीला गंभीर दुखापत, आठवडाभर विश्रांतीची गरज, सेट कोसळला आणि…
‘फिल्मी ग्यान’ला दिलेल्या मुलाखतीत नितीला तिच्या जुन्या रिलेशनशिपबद्दल आणि त्या काळातील अनुभवाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अभिनेत्रीने सांगितलं की, या गोष्टीला आता अनेक वर्षे झाली आहेत. शोमध्ये तिच्या पायावरील खुणांबद्दल सहज विचारण्यात आलं होतं आणि त्यावेळी तिनेही सहजपणे त्या अनुभवाबद्दल सांगितलं. निती म्हणाली की, तिला अजिबात कल्पना नव्हती की या गोष्टीची बाहेर इतकी चर्चा होईल. तिच्या मते, आयुष्यात काही वाईट अनुभव येतात; मात्र त्या अनुभवांमधून बाहेर पडणं आणि पुढे जाऊन नव्याने सुरुवात करणं महत्त्वाचं असतं.
“हो, आता त्या गोष्टीला खूप वर्षे झाली आहेत. पण मला माहीत नव्हतं की बाहेर त्याचं इतकं काही होईल,” असं नितीने सांगितलं.पुढे ती म्हणाली, “वाईट गोष्टी घडत असतात; पण तुम्हाला वाईट अनुभवांतून बाहेर पडावं लागतं, नवीन सुरुवात करण्यासाठी. ते घडलं नसतं तर कदाचित आज मी इथे असले नसते. प्रत्येक गोष्टीमागे कारण असतं.” निती टेलर गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन विश्वात काम करत आहे. निती टेलरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्रीने १३ ऑगस्ट २०२० रोजी परीक्षित बावा यांच्यासोबत लग्न केलं. परीक्षित हे भारतीय लष्करातील अधिकारी आहेत. निती आणि परीक्षित त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी असून अभिनेत्री सध्या ‘अलायन्स’ या रिअॅलिटी शोमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

